अहिल्यानगरच्या ह्या तालुक्यात रेशन घोटाळा ! सजग नागरिकांनी उघड केला प्रकार

Published on -

अकोले तालुक्यातील खेतेवाडीगावासाठी शासकीय गोदामातून निघालेले रेशनचे धान्य बेकायदेशीरपणे अकोले विकास सेवा सोसायटीच्या गोदामात उतरवताना आढळून आले. सजग नागरिकांच्या तत्परतेमुळे हा प्रकार उघड झाला असून, या प्रकरणी दोन व्यक्तींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत पोलीस सूत्रांकडून समजलेली माहिती अशी, की ७ जुलै रोजी दुपारी १२ वाजता खेतेवाडी गावातील लाभार्थ्यांसाठी शासकीय गोदामातून स्वस्त धान्य मालमोटारीत भरून पाठवण्यात आले होते.

मात्र, हे धान्य खेतेवाडीऐवजी अकोले विकास सेवा सोसायटीच्या गोदामात बेकायदेशीररित्या उतरवण्यात येत असल्याचे संदीप भानुदास शेणकर आणि सचिन संदीप शेटे यांच्या निदर्शनास आले. त्यांनी तत्काळ हस्तक्षेप करत चौकशी केली असता, मालमोटारीचा चालक कैलास चंद्रभान चव्हाण (रा. पेमगिरी, ता. संगमनेर) याने ही गाडी गाडे ट्रान्सपोर्टची असल्याचे सांगितले.

वाहन क्रमांक एमएच १७ बीडी १०० या मालमोटारीमध्ये ७०.५ किंटल तांदूळ म्हणजेच १४० गोण्या आढळून आल्या. मात्र, त्यावर कोणताही अत्यावश्यक परवाना नव्हता. या प्रकाराची माहिती मिळताच पुरवठा निरीक्षक संदीप निळे यांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला.

चौकशीत असे स्पष्ट झाले की १०० पैकी ९६ गोण्या अकोले विकास सेवा सोसायटीच्या दुकानात उतरवण्यात आल्या होत्या. तहसीलदार डॉ. सिद्धार्थ मोरे यांच्या आदेशानुसार, पुरवठा निरीक्षक संदीप निळे यांनी ७ जुलै रोजी पंचनामा सादर केला. त्यानंतर ९ जुलै रोजी चौकशी अहवाल तयार करून सादर केला.

त्यावर १० जुलै रोजी तहसीलदार डॉ. मोरे यांनी चालक कैलास चव्हाण आणि सेल्समन भरत मुरलीधर झोळेकर यांच्याविरुद्ध अकोले पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले. त्यानुसार भारतीय दंड संहितेतील संबंधित कलमांखाली गुन्हा नोंदवून पुढील तपास सुरू करण्यात आला आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe
Stay updated!