कर्जत- येथील संत सद्गुरू गोदड महाराज रथयात्रेनिमित्त आयोजित कुस्ती मैदानात आंतरराष्ट्रीय मल्ल पै. रविराज चव्हाण याने अकलूज येथील शिवनेरी तालीम संघाच्या पै. सतपाल सोनटक्के यास नाकपट्टी डावावर चारीमुंड्या चित करीत लोकनेते स्व. पै. रामभाऊ धांडे यांच्या स्मरणार्थ ठेवलल्या सद्गुरू संत श्री. गोदड महाराज केसरीचा मानकरी ठरला. त्याने दोन किलो चांदीची गदा पटकावली. या वेळी उपस्थित हजारो कुस्तीशौकिनांनी संत सद्गुरू गोदड महाराज की जय, बजरंग बली की जय, भारत माता की जयच्या घोषणांनी परिसर दणाणून गेला होता.
कर्जत येथील कै. भास्करदादा तोरडमल आणि कै. दिलीपनाना तोरडमल कुस्ती संकुलाच्या मैदानावर संत सद्गुरू गोदड महाराज रथयात्रेनिमित्त आयोजित कुस्ती मैदानास दिमाखदार सुरुवात झाली. या मैदानात दुसऱ्या नंबर च्या कुस्तीत प्रशांत जगताप (कुंभारगाव) याने पै. शुभम कोळेकर (पुणे) यावर एकटांग डावाने मात केली.

आखाड्यात लहान मोठ्या एकूण ७० श्वास रोखून धरायला लावणाऱ्या कुस्त्या रंगल्या. कुस्त्या पाहण्यासाठी खास खुर्च्याची बैठक व्यवस्था करण्यात आली होती. हजारो कुस्ती शौकिनांनी प्रेक्षक गॅलरी तुडुंब भरली होती. या मैदानात बाप्पाजी धांडे, प्रवीण घुले, शहाजी नलवडे, प्रशांत पाटील, प्रा. शिवाजी धांडे, ऋषिकेश धांडे, अंबादास पिसाळ, नामदेव राऊत, तानाजी पाटील, ओंकार पाटील, काका धांडे, नारायण नेटके आदींनी पंच म्हणून काम पाहिले.
किरण नलवडे यानी संयोजन केले तर प्रशांत भागवत, युवराज सोलनकर यांनी कुस्ती स्पर्धेचे सूत्रसंचालन केले. एकेकाळी कुस्ती मैदान गाजलेले पै. बाबा आंधळे, पै. आदम शेख, विजय मोढळे, पै. अभिषेक धांडे, पै. शुभम धांडे, पै. संतोष गायकवाड, पै. काका शेळके, बापू शेळके, अजित मोढळे , पप्पू मोढळे यांनी आवर्जून हजेरी लावली तर उदयोन्मुख कुस्तीगीर विकास तोरडमल, धुळाजी इरकर, गणेश चव्हाण, दादा खांडेकर, सुयोग माने, शंभू बिडगर, प्रणव मोहोळकर, यश धोदाड, शंभू जाधव, कार्तिक वडवकर, सोहम गोयकर, सोहम समुद्र, प्रताप शेंडे, आदित्य परदेशी यांनी प्रेक्षणीय कुस्त्या करून प्रेक्षकांची मने जिंकली.
मतदारसंघाचे आमदार रोहित पवार यांनी भेट दिली. या वेळी त्यांच्या हस्ते कुस्ती लावण्यात आली. तसेच त्यांनी या वेळी श्री संत सद्गुरू गोदड महाराज यात्रा कमिटीस एक लाख रुपये देणगी दिली. ती वर्गणी मेघनाथ पाटील यांच्याकडे सुपूर्द केली.