जामखेड- महाराष्ट्र मेडिकल कौन्सिलमध्ये सीसीएमपी धारक डॉक्टरांची रजिस्ट्रेशन करण्यास स्थगिती दिल्याबद्दल जामखेड तालुका होमिओपॅथिक डॉक्टर असोसिएशनतर्फे काल जामखेड येथे तहसीलदारांना निवेदन देण्यात आले.
दरम्यान, संदर्भात १६ जुलैपासून आझाद मैदान मुंबई येथे आमरण उपोषण करण्यात येणार आहे. या उपोषणास जामखेड तालुक्यातील होमिओपॅथिक डॉक्टरांचा पाठिंबा असणार आहे. जामखेड येथील तहसीलदारांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, दि.९ जानेवारी २०१४ रोजी मंत्रिमंडळाने मंजुरी देऊन राज्यातील होमिओपॅथी डॉक्टरांना अॅलोपॅथीची परवानगी एमबीबीएस कॉलेजमध्ये एक वर्षाचा कोर्स सुरू केला आहे. जून २०१४ च्या अधिवेशनामध्ये याला विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहाने मंजुरी दिली. यामध्ये होमिओपॅथिक प्रॅक्टिशनर अॅक्ट १९६० मध्ये बदल करत होमिओपॅथी डॉक्टरांना अॅलोपॅथीची परवानगी व एमबीबीएस कॉलेजमध्ये एक वर्षाचा सीसीएमपी कोर्स करण्यासाठी परवानगी देण्यात आली.

सोबतच महाराष्ट्र मेडिकल कौन्सिल अॅक्ट १९६५ मध्ये सुधारणा करत जे होमिओपॅथी डॉक्टर्स एमबीबीएस कॉलेजमधून एक वर्षाचा सीसीएमपी कोर्स पूर्ण करतील, त्यांच्यासाठी शेड्युल २८ अंतर्गत स्वतंत्र नोंदणी पुस्तिका ठेवण्यात येईल व त्याची नोंदणी या स्वतंत्र नोंदणी पुस्तिकेमध्ये करण्यात
येईल, असा कायदा संमत करण्यात आला.
दि.१ जुलै २०१४ पासून हा कायदा राज्यात अंमलात आला. दि.८ जुलै २०२४ रोजी राजपत्रामध्ये हा कायदा प्रसिद्ध झाला; परंतु गेल्या दहा वर्षापासून ही नोंदणी मिळत नव्हती. दि.१५ जुलै २०२५ पासून ही नोंदणी देण्यात येणार होती. तसे नोटिफिकेशनही महाराष्ट्र मेडिकल कौन्सिलने काढले होते. मात्र, राज्य सरकारने अचानक इतर वैद्यक संघटनांच्या दबावापोटी निर्णय घेत नोंदणी स्थगित केली आहे.
हा राज्यातील एक लाख होमिओपॅथी डॉक्टरांवर मोठा अन्याय आहे. यासंदर्भात १६ जुलैपासून आझाद मैदान मुंबई येथे आमरण उपोषण करण्यात येणार आहे यामध्ये राज्यातील हजारो डॉक्टर्स सामील होणार आहेत. शासनाने लवकरात लवकर रजिस्ट्रेशन चालू करून ग्रामीण भागातील आरोग्यसेवेचा प्रश्न सोडवावा. निवेदन देताना संघटनेचे अध्यक्ष डॉ. संजय राऊत, – डॉ. सुरेश काशीद, डॉ. तानाजी राळेभात, खर्डा असोसिएशनचे अध्यक्ष डॉ. बिपिन लाड, डॉ. अशोक बांगर, डॉ. राजकुमार सानप, डॉ. प्रदीप कुडके, डॉ. प्रशांत शहाणे, डॉ. मुकुंद ओमासे, डॉ. अजय यादव उपस्थित होते.