अकोले- नवी दिल्लीतील महाराष्ट्र परिचय केंद्रात अधीक्षक पदावर कार्यरत असलेल्या रघुनाथ सोनवणे यांचे सुपुत्र आणि अहिल्यानगर जिल्ह्यातील अकोले येथील रहिवासी असलेल्या स्टेट बँकेचे निवृत्त अधिकारी बी. आर. सोनवणे यांचे पुतणे, रुपेश रघुनाथ सोनवणे (वय २३ वर्षे) यांचा ५ जुलै २०२५ रोजी गाजियाबाद येथे संशयास्पद परिस्थितीत मृत्यू झाला.
रूपेश यांचे जन्मगाव खरशिंदे (अहिल्यानगर) आहे. त्यांच्या या अकस्मात निधनाने कुटुंबीय, मित्रपरिवार आणि परिचितांमध्ये दुःखाचे सावट पसरले आहे.

रूपेश हे एक प्रतिभावान, प्रामाणिक आणि कर्तव्यदक्ष युवक होते. मित्रांना रात्री-अपरात्री मदतीला धावून जाणारा हा मनमिळावू आणि संवेदनशील तरुण सर्वांचा लाडका होता. त्यांच्या पश्चात वडील रघुनाथ सोनवणे, आई, मोठी बहीण आणि भाऊ असा परिवार आहे. त्यांच्या निधनाची बातमी समजताच नातेवाईक आणि मित्रपरिवाराने शोक व्यक्त केला.
रूपेश यांच्या पार्थिवावर गाजियाबाद येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. या दुःखद प्रसंगी अनेकांनी सोनवणे कुटुंबियांच्या दुःखात सहभाग घेत संवेदना व्यक्त केल्या. या मृत्यूमागील नेमके कारण शोधण्यासाठी चौकशी होणे आवश्यक असल्याचे मत काही नातेवाईकांनी व्यक्त केले आहे.