निळवंडे पाईपलाईनच्या जवळ टाकण्यात येत असलेल्या विजेच्या खांबाची जागा बदला, मुख्याधिकाऱ्यांचे वीज वितरण कंपनीला पत्र

Published on -

संगमनेर- वीज वितरण कंपनीकडून तालुक्यातील चिखली फाटा ते श्रमिक मिल्क अँड फूड प्रोसेसिंग इंडस्ट्री पर्यंत निळवंडे जलवाहिनीच्या जवळ विजेचे खांब टाकण्यात येत आहेत. सुरक्षिततेच्यादृष्टीने या खांबांची जागा बदलण्यात यावी, अशी सूचना संगमनेर नगर परिषदेच्या मुख्याधिकाऱ्यांनी वीज वितरण कंपनीला केली आहे. याबाबत त्यांनी वीज वितरण कंपनीचे कार्यकारी अधिकारी यांना पत्र दिले आहे.

या पत्रात त्यांनी म्हटले आहे की, वितरण कंपनीच्यावतीने निळवंडे जलवाहिनीला खेटून वीज वाहिनी (ओव्हरहेड) चे पोल टाकण्याचे काम सुरू असून ते अंतिम टप्प्यात असल्याचे निदर्शनास आलेले आहे. सदर वीज वाहिनीचे काही पोल हे पाईप लाईनच्या अगदी जवळ उभे करण्यात आलेले आहेत. निळवंडे धरणापासून संगमनेरला जोडणारी ही एकमेव पाईपलाईन असून सुरक्षिततेच्यादृष्टीने संगमनेर शहरातील नागरिकांच्या जीवनाशी अवलंबून असल्याने पाईपलाईनपासून दोन मीटर अंतरावर पोल हे शिफ्ट करण्यात यावे.

संगमनेर शहराचा पूर्ण पाणीपुरवठा या पाईपलाईन वर अवलंबून आहे. वीज वितरण कार्यालयामार्फत चिखली फाट्यापासून मे. श्रमिक मिल्क अँड फूड प्रोसेसिंग इंडस्ट्रीपर्यंत पाईपलाईनच्या बाजूस पोल टाकण्याचे काम सुरू आहे. काही पोल हे पाईप लाईनच्या अगदी जवळ उभे करण्यात आलेले आहेत. पाईपलाईन दुरुस्तीसाठी किमान पाईपलाईन पासून दोन मीटर अंतरावर पोल उभे करणे आवश्यक आहे. त्यामुळे हे खांब अन्य ठिकाणी बसविण्यात यावे, अशी सूचना या पत्राद्वारे करण्यात आले आहे.

चिखली ग्रामस्थांचे चार तास आंदोलन

ग्रामस्थांना विश्वासात न घेता विजेचे खांब टाकण्यात येत असल्याने संतप्त झालेल्या शेतकऱ्यांनी काल चार तास आंदोलन केले. श्रमिक उद्योग समूहासाठी विजेच्या पुरवठा व्हावा यासाठी हे विजेचे थांब टाकण्यात येत असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला. वीज वितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांनी याबाबत चिखली येथील ग्रामस्थांना विश्वासात घेतलेले नाही. या पोलमुळे धोका निर्माण होऊ शकतो, असा आरोप करत ग्रामस्थांनी या पोलचे काम करू नये यासाठी काल तब्बल चार तास आंदोलन केले. ग्रामस्थांच्या आंदोलनानंतरही पोलीस बंदोबस्तात विजेचे खांब टाकण्याचे काम सुरू होते.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe
Stay updated!