शेवगाव- सन २०२५ ते ३० या पंचवार्षिक कालावधीसाठी जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेल्या आदेशानुसार शेवगाव तालुक्यातील ९४ ग्रामपंचायतीच्या सरपंच पदाची आरक्षण सोडत आज (दि.२३) रोजी जाहीर होणार असल्याची तहसीलदार आकाश दहाडदे व निवडणूक शाखेचे नायब तहसीलदार राजेंद्र बकरे यांनी दिली.
याबाबत अधिक माहिती देताना त्यांनी सांगितले की, तालुक्यात सन २५ ते ३० या पंचवार्षिक कालावधीसाठी ९४ ग्रामपंचायतीच्या सरपंच पदाची सोडत आज बुधवार (दि.२३) रोजी जाहीर करण्यात येत आहे. या पूर्वीही ही आरक्षण सोडत २३ व २४ एप्रिल २५ रोजी जाहीर करण्यात आली होती;

परंतु आता पुन्हा सरपंच पदाच्या सोडतीबाबतचे नव्याने आदेश प्राप्त झाल्याने ही सोडत आज पार पडत आहे. या सोडतीमध्ये ९४ ग्रामपंचायतींमध्ये १० जागा अनुसूचित जातीसाठी निश्चित करण्यात आल्या असून, त्यामध्ये ५ पुरुषांसाठी तर ५ महिलांसाठी, २ जागा अनुसूचित जमातीसाठी निश्चित करण्यात आल्या असून, त्यामध्ये १ पुरुषांसाठी तर महिलांसाठी आहे.
नागरिकांचा मागास प्रवर्गासाठी २५ जागा असून, त्यामध्ये १२ पुरुषांसाठी, १३ महिलांसाठी तर ५७ जागा खुल्या प्रवर्गासाठी निश्चित करण्यात आल्या असून, त्यामध्ये २८ पुरुषांसाठी तर २९ महिलांसाठी जाहीर करण्यात येणार आहेत, असेही शेवटी दहाडदे, बकरे व महसूल सहाय्य सुरेश बर्डे यांनी सांगितले.