अहिल्यानगरमधील ‘या’ बँकेला रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने दिला ‘शेड्यूल्ड बँक’चा दर्जा

Published on -

अहिल्यानगर- अहिल्यानगरच्या आर्थिक क्षेत्रात महत्त्वपूर्ण योगदान देणाऱ्या अहमदनगर मर्चेंट्स को ऑपरेटिव्ह बँकेला रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने ‘शेड्यूल्ड बँक’चा दर्जा दिला आहे. गुरुपौर्णिमेच्या शुभमुहूर्तावर बँकेला ‘शेड्यूल्ड बँक’चा दर्जा मिळाला आहे. यासाठी गेल्या अनेक वर्षांपासून बँक प्रयत्न शील होती. या दर्जामुळे बँकेची विश्वासार्हता, कार्यक्षमता वाढून व्यावसायिक विस्तारात मोठी वाढ होणार आहे, अशी माहिती बँकेचे संस्थापक चेअरमन हस्तीमल मुनोत यांनी पत्रकार परिषदेत दिली.

पत्रकार परिषदेला बँकेचे व्हा. चेअरमन अमित मुथा, संचालक अनिल पोखरणा, आनंदराम मुनोत, संजय चोपडा, सीए मोहनलाल बरमेचा, संजय बोरा, सीए अजय मुथा, किशोर मुनोत, सुभाष बायड, श्रीमती मीना मुनोत, विजय कोथिंबीरे, बोर्ड ऑफ मॅनेजमेंटचे सदस्य राजेश झंवर, कर्मचारी प्रतिनिधी प्रसाद गांधी, मुख्य कार्यकारी अधिकारी सुनील पुराणिक, जाईंट सीईओ नितीन भंडारी आदी उपस्थित होते. यावेळी बँकेला ‘शेड्यूल्ड बँक’चा दर्जा मिळण्यासाठी प्रयत्न केल्याबद्दल चेअरमन हस्तीमल मुनोत यांचा संचालक मंडळाने सन्मान करीत पेढे वाटून आनंद व्यक्त केला.

चेअरमन हस्तीमल मुनोत म्हणाले की, रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने तब्बल दोन दशकांनंतर अर्बन को ऑपरेटिव्ह बँकांना शेड्यूल्ड बँक दर्जा देण्यास सुरुवात केली आहे. यामध्ये महाराष्ट्रातील अहमदनगर मर्चेंट्स को ऑपरेटिव्ह बँकेला प्राधान्याने हा बहुमान देण्यात आला आहे. याबाबत बुधवारी जारी करण्यात आलेल्या गॅजेट अधिसूचनेद्वारे मर्चेंट्स बँकेचा समावेश रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया अधिनियम, १९३४ च्या दुसऱ्या अनुसूचित करण्यात आल्याचे जाहीर करण्यात आले.

बँकेला शेड्यूल्ड बँकेचा दर्जा मिळाल्यामुळे आता आरबीआयच्या विविध सवलती उपलब्ध होणार आहेत. यामध्ये लिक्विडिटी फॅसिलिटीज, क्लिअरिंग हाऊस सिस्टीममध्ये सहभागी होण्याचा हक्क, तसेच शासकीय प्रकल्पांना कर्ज देण्याचा अधिकार यांचा समावेश आहे. यामुळे बँकेची विश्वासार्हता, कार्यक्षमता आणि व्यावसायिक विस्तारात मोठी वाढ होणार आहे. बँकेने कर्जाच्या व्याज दरात एक टक्का कपात करण्याचा निर्णय घेत कर्जदारांना दिलासा दिला आहे.

संचालक अनिल पोखरणा म्हणाले, बँकेला शेडुल्ड बँकेचा दर्जा मिळाल्याने बँकेची उंची वाढली आहे. आता इतर सहकारी बँका व पतसंस्थेच्या ठेवीही बँकेला स्वीकारता येणार असल्याने बँकेच्या ठेवींमध्ये मोठ्याप्रमाणात वाढ होणार आहे.

मुख्य कार्यकारी अधिकारी सुनील पुराणिक यांनी स्वागत करून प्रास्ताविक केले. आभार मानताना व्हाईस चेअरमन अमित मुथा म्हणाले, मर्चेंट्स बँकेच्या प्रगतीत सर्व खातेदार, ठेवीदार
व कर्जदार यांच्यासह बँकेचं सर्व अधिकारी, कर्मचाऱ्यांचेही महत्वपूर्ण योगदान आहे. सर्व संचालक मंडळ एकजुटीने बँकेच्या प्रगतीत मोलाचे योगदान देत उत्कृष्ट टीम वर्क करीत आहेत.

बँकेच्या शिरपेचा आणखी एक मानाचा तुरा

मर्चेंट्स बँकेने नुकताच सुवर्ण महोत्सव साजरा केला आहे. बँकेचे संस्थापक चेअरमन हस्तीमल मुनोत यांच्या मार्गदर्शनाखाली बँकेच्या प्रगतीची घोडदौड कायम असून त्यांच्या नेतृत्वाखाली आता बँकेच्या शिरपेचात ‘शेड्यूल्ड बँक’ दर्जाचा आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे. बँकेच्या दि. ३१ मार्च अखेर एकूण ठेवी १४६२ कोटी १६ लाख रुपयांच्या असून एकूण कर्ज ९६८ कोटी ३९ लाख रुपयांचे वितरीत केले आहे. बँकेस निव्वळ नफा ७ कोटी ३ लाख रुपये झाला आहे.

बँकेचा सी. आर. ए. आर. १५.७५ व नेट एनपीए शून्य टक्के आहे. सर्वोत्कृष्ट बँकिंग सेवा देत मर्चटस बँकेने अत्याधुनिक डिजिटल तंत्रज्ञानाच्या युगात वेगवान बैंकिंग सेवा ग्राहकांना दिल्या आहेत. ‘शेड्यूल्ड बँक’ चा दर्जा मिळणे ही बँकेसाठी ऐतिहासिक उपलब्धी आहे, असे बँकेचे व्हाईस चेअरमन अमित मुथा म्हणाले.

मर्चट्स बँकेचा विस्तार वाढणार

मर्चट्स बँकेने रिझर्व्ह बँकेचे सर्व निकष पूर्ण केल्यानेच प्राधान्याने शेडुल्ड बँकेचा दर्जा बँकेला मिळाला आहे. केंद्रीय गृहमंत्री व सहकार मंत्री अमित शहा यांच्या पुढाकारामुळे हे शक्य झाले आहे. सध्या देशभरात एकूण १४२३ अर्बन को- ऑपरेटिव्ह बँकांपैकी आता ५२ बँका ‘शेड्यूल्ड बँक’ म्हणून मान्यताप्राप्त आहेत. ज्यामध्ये अहमदनगर मर्चेंट्स बँकेचा समावेश झाला असल्याने बँकचा विस्तार आता वाढणार आहे, असे संचालक सीए अजय मुथा म्हणाले.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News

Stay updated!