अहिल्यानगर- पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी अधिकाऱ्यांसमवेत जिल्ह्यातून आलेल्या नागरिकांच्या समस्या जनता दरबारातून जाणून घेतल्या. प्रश्नांचे गांभीर्य लक्षात घेऊन आलेल्या प्रत्येक अर्ज निर्धारीत वेळेत कार्यवाही करण्याच्या सूचना त्यांनी अधिकाऱ्यांना दिल्या.
अहिल्यानगर येथील पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या कार्यालयात रविवारी जनता दरबार आयोजित करण्यात आला होता. अतिरिक्त जिल्हाधिकरी शैलेंद्र हिंगे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी सुधाकर बोराळे, अतिरिक्त पोलीस अधीक्षक वैभव कलुबर्मे, जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संभाजी लांगोरे, जिल्हा आरोग्य अधिकारी नागरगोजे आदींसह सर्वच विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी महिन्यातून एकदा संपर्क कार्यालयात जनता दरबार घेण्याची प्रथा सुरू केली आहे. अधिकाऱ्यांना उपस्थित ठेवून नागरिकांच्या प्रश्नांवर मार्ग काढण्याची मंत्री विखे पाटील यांची हातोटी असल्याने प्रत्येक जनता दरबारास नागरिकांची उपस्थिती लक्षवेधी असते. रविवारी बारा वाजल्यापासून पालकमंत्री कार्यालयात नागरिकांच्या भेटीसाठी उपस्थित होते. शहरासह जिल्ह्यातील अन्य तालुक्यातील नागरिक विविध प्रश्नाची निवेदन देऊन मंत्र्यांसमोर तक्रारी मांडत होते.
संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना बोलावून प्रत्येक अर्जावर कार्यवाही करण्याच्या सूचना तसेच काही अर्जावर निर्धारीत वेळेत कार्यवाही करण्याचे निर्देश त्यांनी अधिकाऱ्यांना दिले. याप्रसंगी भाजपचे जिल्हाध्यक्ष दिलीप भालसिंग, महानगराचे अध्यक्ष अनिल मोहिते, कौशल्य विकास समितीचे सदस्य विनायक देशमुख, माजी नगरसेवक निखील वारे, माजी नगरसेवक अॅड. धनंजय जाधव यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.