संसद पाहण्यासाठी अहिल्यानगर जिल्ह्यातील २०० शिक्षकांना दिल्लीला घेऊन गेलेल्या खासदार नीलेश लंके यांनी मंगळवारी सकाळी त्यांची राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घडवून आणली. शरद पवार, सुप्रिया सुळे यांनी केलेल्या स्वागतामुळे हे सर्व शिक्षक अरक्षशः भारावून गेले.
पवार यांच्या निवासस्थानी भेटीप्रसंगी पवार यांनी अत्यंत सहज आणि हृदयस्पर्शी भाषेत शिक्षकांशी संवाद साधला. ते म्हणाले, आम्ही तर तुमचं स्वागत केलंच, पण वरूण राजानेही केले हे विशेष. या भागात फारसा पाऊस पडत नाही, पण वरूण राजालाही कळलं की हे शिक्षक दुष्काळी भागातून आले आहेत ! हा विनोदाचा क्षण क्षणभरात स्मितहस्याने रंगला. पवार यांचा संवाद शिक्षकांविषयी असलेल्या आपुलकीची साक्ष देत होता.

यावेळी शिक्षकांनी त्यांच्या समस्या पवार यांच्यासमोर मांडल्या. त्या अडचणींवर बोलताना पवार म्हणाले, या समस्यांमध्ये आम्ही लक्ष घालू. ज्या ज्या वेळी आम्ही सत्तेत होतो, त्यावेळी आम्ही शिक्षकांचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी पुढाकार घेतला. त्या काळात शिवाजीराव पाटील व इतर शिक्षक नेते होते त्यांच्याशी चर्चा करून आम्ही प्रश्न मार्गी लावत असू. त्या काळात केंद्र सरकार जे देते त्याच धर्तीवर महाराष्ट्रातील कर्मचाऱ्यांना आम्ही देण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे संघर्षाची वेळ आली नाही असे सांगत पवार यांनी भूतकाळाचीही आठवण यावेळी करून दिली.
यावेळी बोलताना पवार यांनी शिक्षकांना किती साली शिक्षक झालात ? त्यावेळी किती पगार होता ? कधी निवृत्त झालात ? आता किती निवृत्तीवेतन मिळते असे प्रश्न विचारले. त्यावर सुरूवातीचा पगार ९५ रूपये तर आता ४० हजार रूपये निवृत्तीवेतन मिळत असल्याचे उत्तर शिक्षकाकडून देण्यात आल्यानंतर खा. पवार त्या शिक्षकांकडे बोट दाखवत हसले आणि आम्ही भूतकाळात घेतलेल्या निर्णयांमुळे हा बदल झाल्याचे त्यांनी अप्रत्यक्षपणे सुचविले. त्यावर तुमच्यामुळेच आमचे जीवन सुखकर झाल्याचे शिक्षकांनी कृतज्ञतापूर्वक सांगितले.
खा. लंके यांची जादू !
शिक्षकांशी संवाद साधताना पवार म्हणाले, तुम्ही सोमवारी संसदेचे कामकाज पाहिले. त्यासाठी तब्बल २०० पासेस मिळाले याचे मला आश्चर्य वाटले. मी अनेक वर्षे दिल्लीत आहे, परंतू पाच-दहा लोकांपेक्षा अधिक पासेस आम्हाला कधीही मिळाले नाहीत. लंके यांनी काय जादू केली माहीती नसल्याचे पवार यांनी सांगताच एकच हशा पिकला.
शिक्षक म्हणजे जडणघडणीचा पाया
यावेळी खासदार नीलेश लंके यांनी माध्यमांशी संवाद साधताना नम्रतेने सांगितले की, ज्या शिक्षकांनी अनेक पिढया घडविल्या, त्यांच्या ॠणातून उतराई झाले पाहिजे या भावनेतून मी शिक्षकांसाठी नेहमी काही ना काही करत असतो. सेवानिवृत्त शिक्षकांच्या कार्यक्रमामध्ये त्यांनी आम्ही तुम्हाला दिल्लीला पाठविले, आता तुम्ही आम्हाला दिल्ली दाखवा अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली होती. ज्यांच्यामुळे आमच्या राहणीमानाचा दर्जा वाढला, ज्यांच्यामुळे आम्ही समाजामध्ये बसलो त्या पवार साहेबांना आम्हाला दिल्लीत भेटायचे आहे ही देखील शिक्षकांची भावना होती. त्यामुळे निवृत्त शिक्षकांच्या दिल्ली दौऱ्याचे नियोजन करण्यात आल्याचे ते म्हणाले.
अजितदादांना शुभेच्छा
अजितदादांना वाढदिवसाच्या काय शुभेच्छा देणार या प्रश्नावर बोलताना खा. लंके म्हणाले, राजकारण, समाजकारण यात अंतर असते. व्यक्तीगत जीवनात आपण हितसबंध जपत असतो. विरोधक आहोत म्हणून शुभेच्छा देउ नयेत का ? शरद पवार यांच्या वाढदिवसासाठी अजित पवार आणि प्रफुल्ल पटेल हे सर्वात आधी आले होते. दादांचा आज वाढदिवस आहे मी त्यांना शुभेच्छा देणारच. मी आताच दादांना फोन केला होता असे सांगत खा. लंके यांनी फोन काढून स्क्रीनवर डायल केलेला नंबरच पत्रकारांना दाखविला.