शिर्डी- श्री साईबाबा संस्थान,नाट्य रसिक मंच व ग्रामस्थांच्या संयुक्त विद्यमाने २५ जुलै ते १ ऑगस्टदरम्यान साईआश्रम शताब्दी मंडपात श्री साई सच्चरित पारायण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले असून, या कालावधीत विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रम होणार आहेत.
या पारायण सोहळ्याचे हे ३१ वे वर्ष असून, सकाळी ७ ते ११.३० या वेळेत पुरुष व दुपारी १ ते ५.३० दरम्यान महिला वाचक पारायण करतील. पहिल्या दिवशी २५ जुलै रोजी सकाळी ६ वाजता पोथी व फोटोची मिरवणूक निघेल. मंडपात ग्रंथ व कलश पूजन करून पारायणास सुरुवात होईल. सायंकाळी ५.३० वाजता महिला पारायणार्थीना हळदी-कुंकू समारंभ होईल. रात्री ७ ते ९ या वेळेत श्रीसाईबाबा शिक्षण प्रसारक मंडळाच्या सांस्कृतिक कार्यक्रमासह लहू महाराज कराळे यांचे कीर्तन होईल.

२६ जुलै रोजी साई कला मंच, हिंगणघाट यांचे भजन, श्री ज्ञानदेव निवृत्ती गोंदकर यांचे प्रवचन व हर्षद महाराज खैरनार यांचे कीर्तन होईल. २७ जुलैला डॉ. नचिकेत वर्षे यांचे योग व आहार व्याख्यान, साई सारंग बिट्स, मुंबई यांचा कार्यक्रम आणि रामनाथ महाराज शास्त्री यांचे कीर्तन होईल.
२८ जुलै रोजी सायंकाळी डॉ. नचिकेत वर्षे यांचे व्याख्यान व साईदास बाळासाहेब हासे यांचे कीर्तन होईल. २९ जुलै रोजी श्री साईबाबा कन्या – विद्यालयाचा कार्यक्रम, आशाबाई – गोंदकर यांचे प्रवचन व कृष्णा महाराज हजारे यांचे कीर्तन होईल. ३० जुलैला इंग्रजी माध्यमाच्या शाळेतील विद्यार्थ्यांचा कार्यक्रम, देव कुडाळेश्वर मित्र मंडळाचे भजन व ओंकार महाराज बोचरे यांचे कीर्तन होईल.
३१ जुलै रोजी डॉ. विलासराव सोमवंशी यांचे प्रवचन, गोरक्षनाथ नलगे यांची साईकथा व सुजाताताई पाटील यांचे कीर्तन होईल. १ ऑगस्ट रोजी सकाळी पारायण ग्रंथ अध्याय ५३ वाचला जाईल. दुपारी ३ वाजता ग्रंथ मिरवणूक निघेल व वीणा पूजन होईल. २ ऑगस्ट रोजी वैभव ओक यांचे गोपाळकाला कीर्तन व महाप्रसाद होईल. रात्री भानुदास महाराज बैरागी यांचे एकनाथी भारुड होईल.