जिल्ह्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळांची शनिवारची वेळ पूर्वीप्रमाणेच सकाळी ७.३० ते ११ अशी करण्याचा निर्णय जिल्हा परिषद प्रशासनाने घेतला आहे. अलिकडेच ही वेळी सकाळी ९ ते दुपारी १.३० अशी करण्यात आली होती. खा. नीलेश लंके यांनी त्यासंदर्भात शिक्षक संघटना तसेच पालकांच्या मागणीचा विचार करून जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडे शनिवारच्या शाळेची वेळ पूर्ववत करण्याबाबत पत्रव्यवहार केला होता. खा. लंके यांच्या पत्राची दखल घेऊन शाळेची वेळ पुर्ववत करण्यात आली.
खा. लंके यांनी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आनंद भंडारी यांच्याशी पत्रव्यवहार केला होता. प्रशासनाने शनिवारच्या शाळेच्या वेळेत केलेला बदल अत्यंत चुकीचा असल्याचे खा. लंके यांनी निदर्शनास आणून दिले होते. शाळांची वेळ पूर्वीप्रमाणचे करावी कारण जिल्हा परिषदेच्या शाळा या खेडयांमध्ये असल्यामुळे बहुतांशी शेतकरी वर्गातील वाडया-वस्त्यांवरील पालक हे दुपारी शेतीमध्ये कामासाठी जातात. त्यावेळी मुलांना शाळेमध्ये ने-आण करणे अवघड जाते. त्यामुळे पालकांनी शाळेच्या वेळेत करण्यात आलेल्या बदलांबाबत खा. लंके यांच्याकडे तक्रारी करून शाळेची वेळ पुर्ववत करण्याची मागणी केली होती. विविध शिक्षक संघटनांनीही खा. लंके यांच्याकडे शाळेची वेळ पूर्ववत करण्यासठी साकडे घातले होते.

शनिवारी सकाळी लवकर शाळा भरल्यानंतर कोवळया उन्हात योगासने, सूर्यनमस्कार, प्राणायाम, शारिरीक कवायती करण्यासाठी पूरक वातावरण असते. तसेच आनंददायी शनिवार अंतर्गत शाळेत विविध उपक्रम राबविता येतात.याकडेही खा. लंके यांनी जिल्हा परिषद प्रशासनाचे लक्ष वेधले होते. खा. लंके यांनी उपस्थित केलेल्या विविध मुद्दयांची दखल घेत शाळेची वेळ पुर्ववत करण्याचा निर्णय घेण्यात येऊन जिल्हा परिषदेच्या सर्व शाळांच्या मुख्याध्यापकांना तसे आदेश देण्यात आले आहेत.