बनावट कागदपत्रे तयार करून अल्पसंख्यांक समाजाच्या विद्यार्थ्यांची लाटली शिष्यवृत्ती, दोघांवर पोलिसांत गुन्हा दाखल

Updated on -

वाळकी- केंद्र सरकारच्या वतीने अल्पसंख्यांक समाजाच्या विद्यार्थ्यांना देण्यात येणाऱ्या मॅट्रीकपूर्व शिष्यवृत्ती मिळविण्यासाठी सात विद्यार्थ्यांच्या नावाने बनावट कागदपत्रे तयार करून त्यांचा नगर तालुक्यातील एका नामांकित संस्थेत प्रवेश दाखवून शासनाची ३८ हजार ९०० रुपयांची शिष्यवृत्ती दोघांनी लाटल्याचा प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी दोघांच्या विरुद्ध नगर तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

जिल्हा परिषदेतील योजना विभागाचे शिक्षणाधिकारी बाळासाहेब दादाबा बुगे (वय ५३. रा. बालिकाश्रम रोड, अ.नगर) यांनी याबाबत फिर्याद दिली आहे. आरोपी एन.डी. अन्सार आणि नूर हुसेन (दोघांचे पूर्ण नाव पत्ता माहित नाही) यांनी ही शिष्यवृत्तीची रक्कम लाटली आहे. हा प्रकार सन २०२१-२२ मध्ये झाला असून शिक्षण विभागाने केलेल्या तपासणीत तो समोर आला आहे. या दोघा आरोपींनी अल्पसंख्याक समाजातील सात विद्यार्थ्यांचे बनावट कागदपत्रे तयार करून त्यांचा नगर तालुक्यातील वाळकी येथील एका शिक्षण संस्थेत प्रवेश दाखविला. त्यानंतर या विद्यार्थ्यांचे मॅट्रीकपूर्व शिष्यवृत्ती मिळण्यासाठीचे अर्ज भरून ते शिक्षण विभागाला सादर केले.

शिक्षण विभागाने या अर्जात नमूद बँक खात्यात शिष्यवृत्तीची ३८ हजार ९०० रुपये एवढी रक्कम जमाही केली. नंतरच्या कालावधीत तपासणीमध्ये सातही विद्यार्थ्यांची रक्कम एकाच खात्यात गेल्याचे लक्षात आल्यावर संबंधित शिक्षण संस्थेकडे चौकशी करण्यात आली. त्यात तर या संस्थेत अशा कोणत्याही विद्यार्थ्यांचा प्रवेश झालेला नसून या संस्थेत ११ वी व १२ वी चे वर्ग आहेत.

त्याखालील वर्गच नसल्याचे समोर आले. त्यामुळे या फसवणुकीसाठी संबंधित संस्थेच्या नावाचा ही या आरोपींनी गैरवापर केल्याचे उघड झाले आहे. या प्रकरणी पोलिसांनी दोघांच्या विरुद्ध शासनाची फसवणूक केल्याचा गुन्हा दाखल केला आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News

Stay updated!