पाथर्डी : सार्वजनिक बांधकाम विभाग व नगरपालिकेच्या दुर्लक्षाने तीन महिन्यांपासून उपजिल्हा रुग्णालयाच्या बाहेरील बाजूच्या गटारीतून घाण पाणी रस्त्यावरून वाहत आहे. दुर्गंधीमुळे परिसरातील नागरिकांना त्रास होत असून, उपजिल्हा रुग्णालय घाणीच्या विळख्यात सापडले आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, सार्वजनिक बांधकाम विभागाकडून काही दिवसांपूर्वी मुख्य गटारीचे काम करण्यात आले. कामाची पाहणी करण्यासाठी यंत्रणा उदासीन असल्याने रस्ता खाली व किमान दीड फूट उंच गटार, अशी परिस्थिती झाली आहे. या गटारीचे अर्धवट काम झाल्याने बाजारतळाचा परिसर, नाईक पुतळ्यापासून परिसर अशा ठिकाणची घाण, सांडपाणी याच गटारीतून वाहते.

पालिकेने तुंबलेली गटर न उपसल्याने रस्त्यावर पाणी येते, असे बांधकाम विभागाचे म्हणणे असून, अर्धवट कामामुळे व बंदिस्त गटार असल्याने कर्मचाऱ्यांना तेथे काम करता येत नाही, असे पालिका
आरोग्य विभागाचे म्हणणे आहे. यापूर्वी ती गटार उपजिल्हा रुग्णालयासमोरील मुख्य गटारीला जोडली गेली होती.
नव्या कामामुळे पुढचे जुन्या गटारीचे अर्धवट काम, त्यामागे नव्या गटारीचे काम उरकण्यात आले. परिसरातील रहिवाशांकडून उघड्या गटारीमध्ये कचरा टाकला जातो. हॉटेल व्यावसायिकांची घाण तेथेच येऊन पडते. मटणाचे तुकडे, अन्य प्रकारची घाण बाहेर उघड्यावर पडून तेथे मोकाट जनावरे, डुकरे, कुत्री, दिवसभर घाण पसरवतात. हा रस्ता अहिल्यानगरहून पाथर्डी तिथून मोहटा देवी व पुढे बीडला जातो. रस्त्यावरून वाहणारी गटार, इथून वावरणारे लोक व वाहनांद्वारे इतरत्र पसरवली जाते.
उपजिल्हा रुग्णालयाच्या गेट क्रमांक दोनमधून वावरणाऱ्या लोकांना या घाणीचा तर त्रास होतोच. परंतु वाहन अथवा पायी चालणाऱ्या लोकांच्या पायाला लागलेली घाण रुग्णालयाच्या मुख्य द्वारासह अन्यत्र पसरते. यामुळे रुग्णालयाचेही आरोग्य धोक्यात आले आहे. दुर्गंधी, दलदल, घाण, मोकाट
जनावरे, अशा वातावरणाने संपूर्ण परिसरातील नागरिक त्रस्त झाले आहेत. साथ रोगांचा फैलाव वाढला असून, व्यावसायिकांसह सार्वजनिक वाहून जाणारी पाणी येथून जात असल्याने हा परिसर दिवसभर घाणीने माखलेला असतो.
अलीकडील शंभर फुटांवर भाजी बाजार, फळबाजार असतो. या घाणीतून तोंड घातलेले मोकट जनावरे फळे व भाजीपाल्याला येऊन पुन्हा तोंड लावतात. कारण रस्त्यावर बसलेले विक्रेते झुंडीने वावरणाऱ्या मोकाट जनावरांना प्रभावीपणे प्रतिबंध करू शकत नाहीत. मुख्य गटारीची अशी अवस्था तर यापेक्षाही गावातून वाहणाऱ्या सांडपाण्यानेसुद्धा लोकांना वावरणे त्रासदायक झाले आहे. पाणी सुटल्यानंतर मेन रोड, क्रांती चौक, जय भवानी चौक, अष्टवाडा या भागाला गटारीचे रूप येते. जैन स्थानकाजवळ जायकवाडी योजनेचे काम करताना ठेकेदाराकडून खासगी नळ तुटला.
पाणी सुटल्यानंतर किमान पाऊण तास अर्धा इंची नळ सतत वाहतो. रस्त्याला गटारीची रूप येते. तरीही याकडे पालिका पाणीपुरवठा विभाग व संबंधित ठेकेदाराचे लक्ष नाही. पालिकेच्या पाणीपुरवठा विभाग प्रमुखाला याबाबत रहिवाशांनी किमान आठ वेळेस समक्ष जाऊन सांगितले तरीही दखल घेतली जात नाही, त्यामुळे रहिवासी त्रस्त झाले असून, कुणीही दाद लागू देत नसल्याने तक्रार करायची कुणाकडे, असा प्रश्न सर्वसामान्य लोकांना पडला आहे.
पालिकेच्या पाणीपुरवठा विभागाकडून पाणी सोडण्यात भेदभाव केला जातो. काही भागात भरपूर प्रमाणात पाणी तर काही भागात दहा दिवसांतून एक वेळ पाणी दिले जाते. कर्मचाऱ्यांना पाण्याबाबत विचारले तर ते वरून पाणी आले नाही, आम्ही कुठून पाणी देणार, असे उत्तर देतात. मुख्याधिकाऱ्यांचे कर्मचाऱ्यांवर राहिले नाही. मुख्याधिकाऱ्यांचा आदेश कर्मचाऱ्यांकडून पाळला जात नाही. पालिकेचे पाणी वाटप नियोजन कोलमडले आहे.