पाथर्डी- मोठ्यांची कामे सर्वजण करतात. तालुक्यातील उपेक्षित, दुर्लक्षित असलेल्या छोट्या वर्गासाठी कामे करत विकासाचा अनुशेष भरून काढण्याचा प्रयत्न राहील. शेवगाव – पाथर्डी भाग दुर्लक्षित राहिला आहे. चांगल्या कामाला तालुक्यात निधी कमी पडू दिला जाणार नाही, अशी माहिती आमदार शिवाजीराव गर्जे यांनी दिली.
शहरातील विविध विभागातील विकासकामांच्यो भूमिपूजन कार्यक्रमानंतर नागरिकांशी संवादाचा कार्यक्रम भगवान उद्यानामध्ये संपन्न झाला. अध्यक्षस्थानी माजी प्राचार्य डॉ. जी.पी. ढाकणे, तर प्रमुख पाहुणे म्हणून ज्ञानेश्वर विद्यालयाचे प्राचार्य सुरेश मिसाळ, ज्येष्ठनेते भगवान बांगर, भीमराव फुंदे, रणजीत बेळगे, मनीषा डांभे, संदीप पालवे, बाळासाहेब दराडे, शिवसेनेचे भगवान दराडे, ओम प्रकाश दहिफळे, आदींसह भगवाननगर, फुलेनगर परिसरातील नागरिक उपस्थित होते.

ही दोन्ही उपनगरे शहरातील उच्चभ्रू वस्ती म्हणून ओळखली जातात. शिक्षण क्षेत्र, शासकीय नोकरदार या भागात प्रामुख्याने राहतात. या वेळी बोलताना आ. गर्जे म्हणाले, वाचा सिद्ध संत नारायण महाराज तारकेश्वर गडकर यांनी सुमारे २५ वर्षांपूर्वी आमदारकीबाबत भाष्य केले होते. त्यांच्या आशीर्वादाने व उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दाखवलेल्या विश्वासामुळे आपल्याला आमदारकीची संधी मिळाली. राजकारण हा आपला पिंड नाही. कुटुंबातील पुढील पिढ्यांना आपण राजकारणाकडे लक्ष न देण्याचा सल्लासुद्धा दिला आहे.
प्रशासकीय सेवाकाळात कामकाजाच्या माहिती बरोबरच गोरगरीब गरजू व असह्य लोकांना जवळून पाहता आले. या घटकापर्यंत योजनांचा प्रवाह लवकर पोहोचत नसल्याने याच वर्गासाठी विशेष लक्ष देऊन अधिकाधिक कामे करता येतील. पर्यावरणाच्या दृष्टीने देशी झाडे लावण्याला प्राधान्य देऊन पर्यावरण रक्षणासाठी विशेष मोहीम राबविण्याचा प्रयत्न राहील. विदेशी झाडांचा पर्यावरणासाठी फारसा उपयोग होत नाही. लिंब पिंपळ वड, अशी झाडे लावून पुढील पिढ्यांना निरोगी जीवनमानाची संधी द्यावी लागेल. शहरातील ज्येष्ठ नागरिकांचे प्रमाण वाढत आहे.
सर्व ताणतणावातून बाजूला राहत हलकीफुलकी जीवनशैली जगण्यासाठी जेष्ठ नागरिकांना जागा उपलब्ध झाल्यास आपण या भागात भवन उभारून देण्याला प्राधान्य देऊ.
येथील नागरिकांच्या मागणीनुसार दोन मोठया हायमास्ट पथदिव्यांसाठी निधी देत असल्याचे त्यांनी सांगितले. आ. गर्जे यांनी बालपण, शैक्षणिक व सेवाकार्यातील आठवणींना भाषणातून उजाळा दिला. तालुक्यातील दुलेचांदगाव हे त्यांचे मूळ गाव आहे.
या वेळी ज्येष्ठ नेते भीमराव फुंदे म्हणाले, आ. शिवाजीराव गर्जे यांनी विकासकामांबाबत मतदारसंघावर पूर्ण लक्ष केंद्रित केले असून, कोणत्याही नेत्याने केली नसतील एवढी वैयक्तिक कामे त्यांनी कार्यक्षेत्रातील लोकांची केली आहेत. लोकांचा कलसुद्धा बदलत आहे. विधानसभेच्या आमदारकीनंतरही एक वर्ष गर्जे यांची आमदारकी राहणार असून, मतदारसंघाचे पुढील आमदार निश्चितपणे तेच होतील. प्रास्ताविक रावसाहेब आंधळे, सूत्रसंचालन भागिनाथ बडे तर आभार महादेव पालवे यांनी मानले.