अहिल्यानगर- अहिल्यानगरमधून राजस्थान मारवाड जंक्शन, अजमेर या ठिकाणी जाणाऱ्या येणाऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणावर आहे. मात्र, या मार्गावर कोणतीही थेट रेल्वे नाही. यामुळे प्रवाशांची मोठी गैरसोय होते. त्यामुळे या मार्गावर रेल्वे सुरू करण्याबाबत खा. निलेश लंकेंकडे ठाकरे शिवसेनेच्या वतीने शहरप्रमुख किरण काळे यांनी निवेदन देत मागणी केली आहे.
खा. लंके नुकतेच पावसाळी संसदीय अधिवेशनासाठी दिल्लीकडे रवाना झाले. यावेळी रेल्वे स्टेशन येथे त्यांची शहर शिवसेनेच्या शिष्टमंडळाच्या वतीने भेट घेत खा. लंके यांचे काळे यांनी या मागणीकडे लक्ष वेधले. यावेळी राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके, प्रदेश सरचिटणीस अशोक बाबर, प्रदेश पदाधिकारी प्रा. सिताराम काकडे, कामगार सेनेचे नेते विलास उबाळे, माजी नगरसेवक योगीराज गाडे, विकास भिंगारदिवे, आकाश आल्हाट, महावीर मुथा, अल्पसंख्यांक काँग्रेस आघाडीचे शहर जिल्हाध्यक्ष अनिस चुडीवाला आदी उपस्थित होते.

निवेदनात काळे यांनी म्हटले की, अहिल्यानगर शहरामध्ये जैन, मारवाडी बांधवांची लोकसंख्या मोठी आहे. त्यामुळेच नगरला मिनी मारवाड म्हटले जाते. राजस्थानमध्ये अनेकांचे कुलदैवत आहे. त्यामुळे दरवर्षी मोठ्या संख्येने अनेक कुटुंब दर्शना करिता राजस्थानकडे जात असतात. शहरात राष्ट्रसंत आनंदऋषीजी महाराज यांचे समाधीस्थळ आहे. देशाच्या सर्व भागातून जैन बांधव समाधीस्थळी भेट देण्यासाठी येत असतात. त्यामध्ये राजस्थानातून येणाऱ्या भाविकांची संख्या मोठी आहे.
काळे पुढे म्हणाले, शहरामध्ये मुस्लिम बांधवांची देखील मोठी संख्या आहे. अजमेरच्या दर्या समोर नतमस्तक होण्यासाठी शहरातील मुस्लिम बांधवांसह हिंदू बांधव देखील मोठ्या संख्येने दरवर्षी जात असतात. मात्र, या मार्गावर कोणतीही थेट रेल्वे नाही. त्यामुळे जाणाऱ्या – येणाऱ्या प्रवाशांची गैरसोय होते. ती दूर होण्याकरिता नगरहून राजस्थानकडे मारवाड, अजमेर या ठिकाणांकडे जाण्याकरिता आठवड्यातून किमान एक ते दोन रेल्वे सुरू करण्याबाबत अधिवेशन काळात केंद्रीय रेल्वे मंत्री, भारत सरकारकडे मतदारसंघाचे खासदार म्हणून मागणी करावी, असे यावेळी बोलताना काळे म्हणाले.