अहिल्यानगर- शहरातील एमआयडीसीमधील कामगार हॉस्पिटलचा प्रश्न राज्य शासनाकडे अनेक वर्षांपासून धुळखात पडून असून तो मार्गी लावण्यासाठी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख बाबुशेठ टायरवाले यांनी उद्योग मंत्री सावंत यांची भेट घेऊन सविस्तर चर्चा केली असून निवेदन दिले. लवकरच एमआयडीसीमध्ये कामगार हॉस्पिटल बांधण्यासाठी भूखंड उपलब्ध करून दिला जाणार असल्याचे आश्वासन उद्योग मंत्री उदय सावंत यांनी दिले.
नगर एमआयडीसी हजारो कामगार काम करत असून त्यांच्या आरोग्याचा प्रश्न कायमस्वरूपी मार्गी लावणे गरजेचे आहे. दर महिन्याला कामगारांच्या पगारातून तीनशे रुपये कट होत असतात. त्यांच्या हक्काचे हॉस्पिटल एमआयडीसी येथे उपलब्ध होणे गरजेचे आहे. कंपनीमध्ये एखादी अनुचित घटना
घडत असते.

यावेळी त्यांना तातडीने उपचार मिळणे गरजेचे आहे. त्यामुळे त्यांचा जीव वाचू शकतो, अन्यथा एखादी दुर्दैवी घटना घडण्याची शक्यता देखील नाकारता येत नाही, कामगार हा देशाच्या जडणघडणीमधील महत्त्वाचा घटक आहे. अहिल्यानगर एमआयडीसी येथे कामगार हॉस्पिटल लवकरात लवकर करण्यासाठी शासन दरबारी पाठपुरावा करणार असल्याची माहिती शिवसेनेचे जिल्हाप्रमुख बाबुशेठ टायरवाले यांनी दिली.
अहिल्यानगर एमआयडीसीतील कामगार हॉस्पिटलचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी उद्योग मंत्री उदय सावंत यांना निवेदन शिवसेनेचे जिल्हाप्रमुख बाबूशेठ टायरवाले यांनी निवेदन दिले. यावेळी संपर्क मंत्री शंभूराजे देसाई, अभिषेक भोसले, अमोल हुंबे आदी पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.
निवेदनात पुढे शिवसेनेचे जिल्हाप्रमुख बाबूशेठ टायरवाले म्हणाले, अहिल्यानगर एमआयडीसीमध्ये मोठ्या प्रमाणात छोटे, मोठे उद्योग असून मालवाहतूक करण्यासाठी विविध राज्यातून मालट्रक या ठिकाणी येत असतात. त्यांना वाहनतळ उपलब्ध नसल्यामुळे रस्त्याच्या कडेलाच गाड्या लावल्या जातात. त्यामुळे वाहतूक कोंडीची समस्या निर्माण होते. छोटे, मोठे अपघात दररोज होत असतात. त्यामुळे एमआयडीसीत मालवाहतूक गाड्यांसाठी वाहनतळ निर्माण करण्यासाठी भुखंड उपलब्ध करून देण्याची मागणी बाबुशेठ टायरवाले यांनी उद्योगमंत्री उदय सामंत यांच्याकडे केली. दरम्यान, उद्योगमंत्री सांत यांनी दोनही प्रश्न मार्गी लावण्याचे आश्वासन दिले.
कामगार हॉस्पिटल व वाहनतळाचा प्रश्न मार्गी लावणार- मंत्री सांमत
अहिल्यानगर एमआयडीसीमध्ये मालवाहतूक गाड्यांना उभे राहण्यासाठी वाहनतळ निर्माण करण्यासाठी भूखंड उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी यावेळी करण्यात आली. उद्योगमंत्री सावंत यांनी कामगार हॉस्पिटल व मालवाहतूक गाड्यांसाठी वाहनतळ हे दोन्ही प्रश्न तातडीने मार्गी लावले जातील, असे आश्वासन यावेळी दिले असल्याची माहिती बाबुशेठ टायरवाले यांनी दिली.