अहिल्यानगर- शनिशिंगणापूर येथील शनैश्वर देवस्थान ॲप घोटाळ्यात सायबर पोलिसांच्या तपासात खळबजनक गोष्टी समोर आल्या आहेत. ऑनलाईन दर्शनाकरिता देवस्थानने अधिकृत तीन ॲपला परवानगी दिली होती. त्यात पुन्हा चार बनावट ॲपचा शिरकाव झाल्याचेही दिसून आले.
एकूण सात अॅपच्या माध्यमातून देवस्थानच्या दोन कर्मचाऱ्यांच्या बँक खात्यामध्ये एक कोटी रुपये वर्ग झाल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. आता त्या कर्मचाऱ्यांनी एक कोटीची रक्कम कोणाच्या खात्यावर वर्ग केली, याचा कसून तपास सुरू असल्याची माहिती पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांनी दिली.

पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांनी आज पोलीस अधीक्षक कार्यालयात पत्रकारांशी संवाद यांनी दिली. पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांनी आज पोलीस अधीक्षक कार्यालयात पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी अपर पोलीस अधीक्षक वैभव कलुबमें, पोलीस उपाधीक्षक अमोल भारती, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरणकुमार कबाडी आदी उपस्थित होते.
पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे म्हणाले, शनिशिंगणापूर येथील शनैश्वर देवस्थान अॅप घोटाळ्यासंदर्भात अनेक तक्रारी सायबर पोलीस ठाण्यात प्राप्त झाल्या होत्या. तसेच यासंदर्भात विधानसभेतही प्रश्न चर्चिला गेला होता. तक्रारीची चौकशी केली असता प्रथमदर्शनी घोटाव्य झाल्याचे दिसून आले. त्यानुसार सायबर पोलिसांनी स्वतःहून शनिशिंगणापूर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली.
सायबर पोलिसांनी तक्रारदार व देवस्थानमधील काही कर्मचारी, पुजारी असे १२ जणांची चौकशी केली आहे. या चौकशीमध्ये देवस्थानने ऑनलाईन दर्शनासाठी अधिकृत तीन अॅपला परवानगी दिली होती. तर उर्वरित चार अॅप विनापरवाना भाविकांकडून पैसे घेत असल्याचे निष्पन्न झाले आहे. साधारण या सात अॅपच्या माध्यमातून देवस्थानमधील संगणकीय काम करणारा आणि फोटोग्राफर अशा दोन कर्मचाऱ्यांच्या बँक खात्यावर एक कोटी रुपयांचे रक्कम वर्ग झाली झाल्याचे दिसून येत आहे.
ही रक्कम कधी एक लाख तर, कधी दोन लाख अशा पद्धतीची रक्कम जमा झाल्याचेही समोर आले आहे. आता कर्मचाऱ्यांच्या खात्यात वर्ग झालेली रक्कम पुन्हा कोठे गेली याचा शोध सुरू आहे.
विश्वस्तांच्या खात्यावर रूपयाही नाही
सात अॅपच्या माध्यमातून त्या दोन कर्मचाऱ्यांच्या बँक खात्यावर एक कोटी रुपये वर्ग झाले. मात्र, त्यातील देवस्थानला किती मिळाले याचा आज तरी आकडा नाही. यासंदर्भात देवस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी दरंदले यांच्याकडे चौकशी केली असता त्यांनी पडताळणी करून सांगू असे सांगितले. त्यांनी अद्यापि पडताळणी करून सांगितलेले नाही. मात्र, देवस्थानमधील विश्वस्तांच्या खात्यावर एक रुपयाही वर्ग झाला नसल्याचे घार्गे म्हणाले.
ती रक्कम कोठे गेली…
शनैश्वर देवस्थानच्या दोन कर्मचाऱ्यांच्या खात्यात अॅपच्या माध्यमातून एक कोटीची रक्कम जमा झाल्याचे प्रथमदर्शनी तपासात समोर आले आहे. आता या कर्मचाऱ्यांकडून ती रक्कम पुढे कोणाकडे गेली कोणाच्या खात्यात गेली याचा तपास सुरू आहे. दरम्यान, अॅपच्या माध्यमातून विश्वस्तांच्या खात्यामध्ये रक्कम आलेली नाही, असेही घार्गे यांनी सांगितले.
बनावट अॅप आले कसे…
देशातील वारासणी, अयोध्या अशा ठिकाणी देवस्थानच्यावतीने ऑनलाईन दर्शन सेवा उपलब्ध करून दिलेली आहे. त्याधरतीवर शनैश्वर देवस्थानने सेवा उपलब्ध केली होती. मात्र, अधिकृत तीन अॅपला परवानगी दिली असता अन्य चार बनावट अॅप कोणाच्या आशीर्वादाने सुरू होते, याचा पोलीस शोध घेत आहेत. तसेच, हेच अॅप वारासणी, अयोध्या येथेही वापरले आहेत. त्यामुळे संबंधित देवस्थानला पत्रव्यवहार करणार असून, बनावट अॅप बद्दल माहिती कळविणार असल्याचेही घार्गे यांनी सांगितले.