शिर्डी-श्रद्धा आणि सबुरीचा संदेश देणाऱ्या शिर्डीत, दि. २५ जुलै २०२५ पासून श्री साई सच्चरित्र पारायण सोहळा नाट्य रसिक मंच, श्री साईबाबा संस्थान व शिर्डी ग्रामस्थ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आला आहे. २ ऑगस्ट २०२५ पर्यंत चालणाऱ्या या महापर्वासाठी भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन नाट्य रसिक मंचाचे अध्यक्ष अशोक नागरे, कार्याध्यक्ष रमेशभाऊ गोंदकर, आणि सचिव अशोक कोते यांनी केले आहे.
पत्रकात म्हटले आहे, की नाट्य रसिक मंचाच्या माध्यमातून तीस वर्षांपूर्वी सुरू झालेल्या या उपक्रमाला साई भक्तांत विशेष स्थान असून, संस्थान व्यवस्थापनाच्या सहकार्यामुळे या सोहळ्याला भव्य दिव्य स्वरूप प्राप्त झाले आहे. यंदा हा सोहळा साई आश्रम १ जवळील मंडपात संपन्न होणार आहे.
या पारायण सोहळ्यासाठी महिला आणि पुरुष वाचकांसाठी स्वतंत्र बैठक व्यवस्था करण्यात आली आहे.

तसेच बाहेरून येणाऱ्या पारायणार्थीना सोयीसाठी रूमची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. साईबाबा संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर, उप कार्यकारी अधिकारी भिमराज दराडे, तसेच सर्व विभागाचे अधिकारी व कर्मचारी यांचे या आयोजनासाठी सहकार्य लाभणार आहे.
या वर्षीच्या सोहळ्यात केरळ येथील देखावे व मिरवणुका हे मुख्य आकर्षण असणार आहे. दि. २ ऑगस्ट रोजी सकाळी १० ते १२ या वेळेत काल्याचे कीर्तन, तर दुपारी १२ ते ४ या वेळेत महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे. त्यानंतर या पावन सोहळ्याची सांगता होईल. या सोहळ्याच्या यशस्वीतेसाठी अध्यक्ष अशोक नागरे, कार्याध्यक्ष रमेश गोंदकर, सचिव अशोक कोते, शांताराम मिराणे, आप्पासाहेब कोते, गणपत गोंदकर, भाऊसाहेब साबळे, – प्रकाश गायके, अशोक गोंदकर, रामचंद्र सारंगधर, सुभाष घुगे, सुमनबाई गोंदकर, रजनी जोगळेकर, चित्रा इंगळे, रामदास बरदे यांचे सहकार्य लाभत आहे. २४ जुलैपर्यंत नोंदणी खुली आहे.
श्री साईबाबा संस्थान, नाट्य रसिक मंच व शिर्डी ग्रामस्थ यांच्या पुढाकाराने प्रत्येक वर्षी शिर्डीत मोठ्या स्वरूपात साई चरित्र पारायण सोहळ्याचे आयोजन केले जाते. याही वर्षी हा पारायण सोहळा मोठ्या स्वरूपात साजरा करण्यासाठी साई भक्तांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून यात सहभाग घ्यावा.- अशोकराव कोते, सचिव नाट्य रसिक मंच, शिर्डी