अहिल्यानगर- शासनाच्या विविध विकास योजनांच्या माध्यमातून एकल महिलांना प्राधान्य देऊन त्यांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करावे असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया यांनी आज प्रशासकीय यंत्रणेला केले.
जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या संकल्पनेतून जिल्ह्यात एकल महिला सक्षमीकरण पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या ३०० या जयंती वर्षानिमित्त कार्यक्रम हाती घेण्यात आला आहे. त्यानिमित्ताने जिल्हा कौशल्य विकास कार्यकारी समितीची विशेष बैठक जिल्हाधिकारी कार्यालयात डॉ. पंकज आशिया यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी जिल्हाधिकारी डॉ. आशिया बोलत होते.

यावेळी कौशल्य विकास समितीचे सदस्य विनायक देशमुख, कौशल्य विकास विभागाचे सहा. आयुक्त रवींद्र पंतम, जिल्हा व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण अधिकारी सुनील शिंदे, जिल्हा उद्योग केंद्राचे व्यवस्थापक बिरादर, खादी व ग्रामोद्योग अधिकारी बाळासाहेब मुंढे, उमेद चे सोमनाथ जगताप, माविमचे दीपक माने, महानगरपालिकेच्या सुप्रिया घोगरे, जिल्हा कौशल्य विकास अधिकारी शुभदा पाठक, महिला व बालकल्याण विभागाचे एस.डी.जाधव, सी.वाय.डी.ए. चे मोहन कांडेकर, जे.एस.एस. चे बाळासाहेब पवार, साऊ संस्थेचे अशोक कुटे, मिशन वात्सल्य – समितीचे प्रकाश इथापे, प्रथम फौंडेशनचे दिवाकर भोयर आदी – उपस्थित होते.
डॉ. आशिया म्हणाले, एकल महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी विविध विभागातील विकास योजनांमध्ये एकल महिलांना प्राधान्य देण्यात यावे. त्या अंतर्गत आवश्यकतेनुसार योग्य ते प्रशिक्षण, आर्थिक सहाय्य व उद्योजकता मार्गदर्शन यावर भर देण्यात यावा. बैठकीस उपस्थित असलेल्या सदस्यांनी एकल महिलांना प्रशिक्षण व अर्थसहाय्य उपलब्ध होण्यासाठी विविध प्रकारच्या सूचना मांडल्या.
तसेच कार्यक्रमाची अंमलबजावणी करताना येणाऱ्या अडीअडचणी बाबतही चर्चा केली. एकल महिलांना उपयुक्त ठरतील, अशा योजनांचा कौशल्य विकास विभागाच्या प्रस्तावांमध्ये नवीन व्यवसायांचा समावेश करण्याचे यावेळी निश्चित करण्यात आले.