कर्जत-जामखेड तालुक्यातील सहा ग्रामपंचायतींना सभापती राम शिंदे यांच्या प्रयत्नातून मिळाला १ कोटी ५० लाखांचा निधी

Published on -

जामखेड / कर्जत : केंद्र शासनाच्या पुनर्रचित राष्ट्रीय ग्राम स्वराज अभियानातून कर्जत तालुक्यातील भांबोरा, सिध्दटेक, गुरव पिंपरी आणि जामखेड तालुक्यातील हळगाव, साकत, अरणगाव या सहा ग्रामपंचायतींच्या कार्यालयीन इमारती व नागरी सुविधा केंद्र उभारण्यास सरकारने १ कोटी ५० लाख रूपयांचा निधी मंजूर केला आहे.

सदरचा निधी प्राप्त व्हावा याकरिता विधानपरिषद सभापती प्रा राम शिंदे यांनी सरकारकडे पाठपुरावा केला होता. त्यांच्या या प्रयत्नांना यश मिळालं आहे. या निधीमुळे गावपातळीवर दर्जेदार पायाभूत सुविधा निर्माण करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

नागरिकांना गावपातळीवर एका छताखाली आवश्यक शासकीय सेवा मिळाव्यात यासाठी केंद्र सरकारने नवीन ग्रामपंचायत इमारती व ‘सीएससी रूम’ बांधण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार सरकारने महाराष्ट्रातील ५०० ग्रामपंचायतींच्या प्रस्तावास मंजूरी दिली आहे.

यामध्ये जामखेड तालुक्यातील हळगाव, साकत, अरणगाव तर कर्जत तालुक्यातील भांबोरा, सिध्दटेक, गुरव पिंपरी या सहा ग्रामपंचायतींचा समावेश आहे. प्रत्येक ग्रामपंचायतला २५ लाख रूपये निधी मंजुर करण्यात आला आहे. यामध्ये ग्रामपंचायत इमारतीसाठी वीस लाख तर नागरी सुविधा केंद्रासाठी पाच लाख रूपये मिळणार आहेत.

नवीन उभारण्यात येणाऱ्या नागरी सुविधा केंद्रांमुळे नागरिकांना घराजवळच आधार अपडेट, बँकिंग सेवा, उत्पन्न-निवासी दाखले, पेंशन योजना, पीएम किसान योजना, उज्ज्वला गॅस योजना, इतर केंद्र व राज्यशासकीय सेवा यांचा लाभ मिळू शकणार आहे. ग्रामपंचायतींच्या कार्यालयीन सुविधांबरोबरच डिजिटल सेवांचा प्रसार आणि नागरिकांसाठी सोयीसुविधा वाढवण्यासाठी योजनेचा फार मोठा फायदा होणार आहे. विधानपरिषद सभापती प्रा. राम शिंदे यांच्या नेतृत्वात कर्जत जामखेड मतदारसंघातील गावांमध्ये ‘स्मार्ट ग्रामपंचायती’ साकारण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News

Stay updated!