संगमनेर- जमीयत उलेमा ए हिंद,या संघटनेच्या आवाहनानुसार संगमनेर शहरातील कत्तलखाने बंद ठेवण्याचा निर्णय शहरातील कत्तलखाना चालकांनी घेतला आहे. त्यानुसार काल मंगळवार (दि. ८) पासून शहरातील सर्व कत्तलखाने बंद करण्यात आले आहे.
मुस्लिम बांधवांवर होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडण्याचे काम ही संघटना करते. राज्यातील कत्तलखाना चालकांवर मोठ्या प्रमाणावर गुन्हे दाखल होत असल्याने कत्तलखाने बंद करावे, असे आवाहन या संघटनेने केले होते. या संघटनेच्या आवाहनाला प्रतिसाद देत शहरातील सर्व कत्तलखाने नुकतेच बंद करण्यात आले आहे.

कत्तलखाना चालकांविरुद्ध न्यायालयात सुरू असलेल्या खटल्यांमध्ये कुरेशी समाजाला विजय मिळावा, यासाठी कत्तलखाने बंद ठेवण्याचे आवाहन करण्यात आले आहे. संगमनेर प्रमाणेच इतर ठिकाणचेही कत्तलखाने बंद ठेवून आम्हाला सहकार्य करावे, असे आवाहन शहरातील कत्तलखाना चालकांनी केले आहे.
संगमनेर शहरातील कत्तलखाने बंद करावे, या मागणीसाठी अनेकदा आंदोलने झाली आहे. कत्तलखान्यांविरुद्ध शेकडो कारवाया होऊनही हे कत्तलखाने सुरूच होते. जमियत उलेमा ए हिंद, या संघटनेने आवाहन केल्यानंतर शहरातील कत्तलखाने बंद करण्यात आले आहे.