चिचोंडी पाटील- राज्य शासन मोठमोठ्या घोषणा करत सर्वसामान्य नागरिकांना अनेक धक्के देत आहे. यात वीज ग्राहकांना जुने मीटर बदलून त्याजागी स्मार्ट मीटर बसवून दिले जात आहेत. मात्र संबंधित ठेकेदाराकडून हे काम गुणवत्तापूर्वक केले जात आहे की नाही? याकडे महावितरणच्या अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष होत असल्याचे दिसून येत आहे.
नगर तालुक्यातील सारोळा बद्धी येथे महावितरण कार्यालयाकडून स्मार्ट मीटर बसवण्यात आलेले आहेत. मात्र या स्मार्ट मीटरचा फज्जा उडाला असून अनेक मीटर भिंतीवर बसवण्याऐवजी चक्क लटकवलेल्या अवस्थेत दिसून येत आहेत. तसेच जुने विद्युत मीटर हे चक्क कचऱ्यात फेकून दिल्याचे चित्र उघडकीस आले आहे. एकीकडे एकीकडे शासन स्मार्ट सिटी, स्मार्ट मीटर या गोष्टींवर काम करत असून दुसरीकडे मात्र महावितरणकडून ठेकेदाराने घेतलेल्या कामांचा अक्षरशः फज्जा उडाला असल्याचे पहायला मिळत आहे.

त्यामुळे स्मार्ट मीटर नावाला स्मार्ट म्हणून उरले कि काय असा सवाल उपस्थित होत आहे. संबंधित
ठेकेदाराने पूर्वीचे असणारे विद्युत मीटर अक्षरशः फेकून देत स्मार्ट मीटर दरवाजाला अडकवल्याचे प्रकार नगर तालुक्यात उघडकीस झाले आहेत. तरी संबंधित ठेकेदारावरती योग्य ती कारवाई करावी अशी मागणी नागरिकांमधून जोर धरू लागली आहे.
हे स्मार्ट मीटर धोकादायक पद्धतीने अनेक भिंतींवर लटकवल्याने नागरिकांच्या जीविकास धोका निर्माण झाला आहे. याबाबत महावितरण प्रशासनाकडून काय कारवाई करण्यात येते याकडे नागरिकांचे लक्ष लागून आहे.