चोरट्या मार्गाने केली भारतात घुसखोरी, मुंबईत बनवले बनावट आधारकार्ड; अहिल्यानगरमध्ये पकडलेल्या बांग्लादेशींच्या तपासात धक्कादायक माहिती समोर!

Published on -

अहिल्यानगर- एमआयडीसी पोलिस ठाण्याच्या हद्दीत गेल्या आठवड्यात विनापरवाना भारत देशात प्रवेश करणाऱ्या तीन बांगलादेशी नागरिकांना पकडले. त्यांच्याकडे सर्वच ओळखपत्र बनावट असल्याचे तपासात निष्पन्न झाले असून ते ओळखपत्र त्यांनी पाच वर्षांपूर्वी मुंबई परिसरात बनवले आहे.
भारत देशात सीमेवरील चोरट्या मार्गाने त्यांनी प्रवेश केला. नगरमध्ये खडी क्रेशरवर काम करीत असताना ते सोशल मिडीयाच्या माध्यमातून नातेवाईकांच्या संपर्कात असल्याचे पोलिस तपासात समोर आले आहे.

जहांगीर आबू ताहेर शेख (वय ३४), हनिफ अब्दुल खालीद शेख (वय ४०) आणि मुशर्रफ हबीब शेख (वय ४०) अशी त्यांची नावे आहेत. पोलिसांनी त्यांच्याकडून बनावट आधारकार्ड, मतदार ओळखपत्र, पॅन कार्ड, रेशन कार्ड, जन्म दाखले, तसेच बँक खात्याची कागदपत्रे जप्त केली. तपासात त्यांच्याकडे एका नातेवाईकाचा भारतीय पासपोर्टही आढळून आला आहे. २७ जून रोजी मध्यरात्री आर्मी इंटेलिजन्सच्या सदन कमांड विभागाने एमआयडीसी पोलीस पथकासोबत संयुक्त कारवाई करून या तिघांना ताब्यात घेतले होते.

पोलिस तपसात अनेक बाबी उघडकीस आल्या आहेत. तिघे आगरतळा (त्रिपुरा) येथून सीमवरील चोरट्या मार्गाने भारत देशात आले. त्यांनी मुंबईमध्ये गेल्या पाच वर्षांपूर्वी आधारकार्ड, मतदान कार्ड अशी सर्वच ओळखपत्रे बनावट तयार केली, अशी कबुली दिली आहे. काही दिवस मुंबईत राहिल्यानंतर ते अहिल्यानगरमध्ये आले. दरम्यान ते सतत बांगलादेशात नातेवाईकांशी मोबाईलवर सोशल मिडीयाच्या माध्यमातून संपर्कात होते, असेही पोलिस तपासात निष्पन्न झाले आहे. ते तिघेही सध्या न्यायालयीन कोठडीत आहेत.

बांगलादेशी घुसखोरांना मुंबई मध्ये कोणी बनावट ओळखपत्र बनवून दिले. त्यांना अद्यापपर्यंत कोणी कोणी मदत केली याचा कसून तपास सुरू आहे. त्यांना मदत करणाऱ्यांना अटक करण्यात येईल, अशी माहिती एमआयडीसी पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक माणिक चौधरी यांनी दिली.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News

Stay updated!