संगमनेर तालुक्यात काही जण दांडगाई करत आहेत, त्यांना ठामपणे उत्तर देऊ, माजी मंत्री बाळासाहेब थोरातांचा इशारा

Published on -

संगमनेर- काँग्रेसचा विचार हा शाश्वत आणि जनकल्याणकारी आहे. सुसंस्कृत राजकीय परंपरेचा वारसा जपत, तालुक्यातील चुकीच्या गोष्टींना आता उत्तर द्यावेच लागेल, असे प्रतिपादन काँग्रेसच्या राष्ट्रीय वर्किंग कमिटीचे सदस्य आणि माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी संगमनेरमध्ये केले.

सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखान्याच्या प्रांगणात काँग्रेसचे नवनियुक्त तालुकाध्यक्ष अजय फटांगरे यांच्या सत्कार समारंभात थोरात बोलत होते. थोरात म्हणाले, संगमनेर तालुका संघर्षातून उभा राहिलेला आहे.

अनेक वर्षांच्या मेहनतीमुळे या भागाला सुसंस्कृत राजकीय ओळख लाभली आहे. मात्र, सध्या तालुक्यात काही लोक दांडगाई करण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यांच्यावर वेळेत नियंत्रण आणावे लागेल. ज्येष्ठ आणि तरुण कार्यकर्त्यांनी एकत्र येऊन संयमाने, पण ठामपणे उत्तर द्यावे. काँग्रेसचा विचार हा संतांच्या समतेच्या विचाराशी सुसंगत आहे. देशाच्या राज्यघटनेतही हा विचार अंतर्भूत आहे. युवकांनी मतभेद दूर ठेवून काँग्रेसचा विचार गावागावात नेण्याची गरज आहे, असेही थोरात यांनी सांगितले.

येत्या जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि नगरपालिका निवडणुकांमध्ये काँग्रेसने मोठ्यामताधिक्याने विजय मिळवावा, यासाठी सर्व कार्यकर्त्यांनी एकत्र काम करावे असे आवाहनही त्यांनी केले.

फटांगरे म्हणाले, माजी मंत्री थोरात यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस विचार गावपातळीवर पोहोचवण्यासाठी आम्ही कायम कटिबद्ध आहोत. संघर्षाच्या काळात पक्षाची ताकद दाखवून पुन्हा वैभव प्राप्त करू. मावळते तालुकाध्यक्ष मिलिंद कानवडे म्हणाले, काँग्रेसची परंपरा मोठी असून आपण निष्ठेने काम केले. यापुढेही थोरात साहेबांच्या नेतृत्वाखाली प्रामाणिकपणे काम करत राहू.

यावेळी ज्येष्ठ नेते पांडुरंग घुले, इंद्रजीत थोरात, डॉ. जयश्रीताई थोरात, शंकरराव खेमनर, सुधाकर जोशी, विश्वासराव मुर्तडक, सोमेश्वर दिवटे, अर्चनाताई बालोडे, संपतराव डोंगरे, नवनाथ आरगडे, सुरेश झावरे, सुभाष सांगळे, रावसाहेब दुबे आदी मंचावर उपस्थित होते.

प्रास्ताविक नवनाथ आरगडे यांनी केले, तर आभार सोमेश्वर दिवटे यांनी मानले. या वेळी संगमनेर तालुका काँग्रेस, अमृत उद्योग समूहातील विविध संस्थांचे पदाधिकारी आणि युवक काँग्रेसचे अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe
Stay updated!