राहुरी- अहिल्यानगर जिल्ह्यातील संगमनेर, शिर्डी व श्रीरामपूर या उपविभागांमध्ये अनेक वर्षे पोलीस उपविभागीय अधिकारी म्हणून प्रभावी कामगिरी बजावलेले सोमनाथ वाघचौरे यांची श्रीरामपूरचे अपर पोलीस अधीक्षक म्हणून नुकतीच नियुक्ती झाली आहे.
गुन्हे उघडकीस आणण्यात व गुन्हेगारांवर कठोर कारवाई करण्यात त्यांचे विशेष कौशल्य असल्यामुळे त्यांना गुन्हेगारांचा कर्दनकाळ अशी ओळख मिळाली आहे. त्यांनी यापूर्वीही श्रीरामपूर परिसरात अनेक मोठे गुन्हे उघडकीस आणून जनतेचा विश्वास संपादन केला आहे. २०२४ मध्ये त्यांची पदोन्नती होऊन राज्य राखीव पोलीस बल गट क्रमांक ५ येथे बदली करण्यात आली होती.

परंतु आता त्यांची पुन्हा श्रीरामपूर येथे नियुक्ती झाल्याने शहरातील कायदा आणि सुव्यवस्थेचा सशक्त बंदोबस्त राहील, अशी अपेक्षा नागरिकांमधून व्यक्त होत आहे. याआधी श्रीरामपूरचे अपर पोलीस अधीक्षक वैभव कलुबुर्गे यांची काही दिवसांपूर्वी अहिल्यानगर येथे बदली करण्यात आली होती. त्यानंतर नव्या अधिकाऱ्याची प्रतिक्षा होती, ती आता सोमनाथ वाघचौरे यांच्या नियुक्तीने संपुष्टात आली आहे.













