अहिल्यानगर- पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांच्या विशेष पथकाने साधारण एका महिन्यात जिल्हाभरात ५८ ठिकाणी अवैध धंद्यांवर छापे घातले. तब्बल २६९ जणांना ताब्यात घेऊन ५ कोटी ९७ लाख ३ हजार २६३ रुपयाचा मुद्देमाल जप्त केला. ही कारवाई १७ जून ते १९ जुलै दरम्यान केली.
पोलीस अधीक्षक यांच्या आदेशान्वये परिविक्षाधीन पोलीस उपअधीक्षक संतोष खाडे यांच्या विशेष पोलीस पथकाने जिल्ह्यात विविध पोलीस स्टेशन हद्दीत अवैध जुगार, देशी विदेशी दारु, सुगंधी तंबाखू, मावा, वाळू, महाराष्ट्र पोलीस अँक्ट कलम १२२, ३३ (डब्ल्यू), १३१, शस्त्र अधिनियम कलम ४ /२५ प्रमाणे तसेच कुंटणखाना रेड अशा प्रकारे कारवाई करुन ५८ गुन्हे दाखल केलेले असून २६९ आरोपींना जेरबंद करुन ५ कोटी ९७ लाख ०३ हजार २६३ रुपयाचा मुद्देमाल जप्त केला आहे.

या कारवाईत १५ जुगार अड्ड्यावर छापे टाकून १५६ जणांना ताब्यात घेऊन १ कोटी १६ लाख ८ हजार ८१० रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त केला. १६ देशी दारु-विदेशी दारु अड्डयावर छापा टाकून १६ जणांना ताब्यात घेत ८ लाख ४९ हजार ९०७ मुद्देमाल जप्त केला.
सुगंधीत तंबाखूपासून मावा बनवणाऱ्या कारखान्यावर छापा टाकून ५२ जणांना ताब्यात घेऊन २ कोटी १८ लाख ७२ हजार ५४६ रुपयाचा मुद्देमाल जप्त केला. सहा ठिकाणी वाळू तस्करीवर छापा टाकून ३६ जणांना ताब्यात घेऊन २ कोटी ५३ लाख ७२ हजार रुपयाचा मुद्देमाला जप्त केला. एका कुंटणखान्यावर छापा टाकून १७ पिडीत महिलांची सुटका केली.
ही कारवाई पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे, अपर पोलीस अधीक्षक वैभव कलुबर्मे यांचे मार्गदर्शनाखाली, पोलीस अधीक्षक यांचे विशेष पथकाचे प्रमुख परिविक्षाधीन पोलीस उपअधीक्षक संतोष खाडे, पोलीस उपनिरीक्षक राजेंद्र वाघ, पोलीस अंमलदार शंकर चौधरी, दिगंबर कारखेले, मल्लिकार्जुन बनकर, अजय साठे, सुनील पवार, उमेश खेडकर, अरविंद भिंगारदिवे, दिनेश मोरे, सुनील दिघे, अमोल कांबळे, संभाजी बोराडे, विजय ढाकणे, दिपक जाधव, जालिंदर दहिफळे यांचे पथकाने केली आहे.