Ahilyanagar News : अहिल्यानगर- पोलिस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांच्या विशेष पथकाने अहिल्यानगर शहरातील तोफखाना पोलिस ठाण्याच्या हद्दीतील नीलक्रांती चौक, माणकर गल्ली येथे मावा बनविणारे कारखाने उद्ध्वस्त केले. पाच जणांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडून ३ लाख २९ हजार ९०० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला. याप्रकरणी तोफखाना पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
विशेष पथकाचे प्रमुख उपअधीक्षक संतोष खाडे यांना १० जुलै रोजी माहिती मिळाली की, गौरव आल्हाट, (वय ३४, रा. निलक्रांती चौक जि. अहिल्यानगर) हा त्याचे अभिनव पान स्टॉल, निलक्रांती चौकात तंबाखूजन्य पदार्थाचे विक्री व मावा तयार करीत आहे. त्यानुसार पोलिस पथकाने नीलक्रांती चौकातील पान स्टॉल छापा घातला असता गौरव आल्हाट सुगंधीत तंबाखू विक्री करताना आढळून आला.

त्याच्याकडून १४०० रुपयांची दोन किलो सुगंधीत तंबाखू जप्त केली. चौकशीत त्याने नीलक्रांती चौकातील घरी मशिनचा वापर करून मावा तयार करीत असल्याचे सांगितले. त्याच्या घराची झडती घेतली असता ८० हजारांची मावा तयार करण्याची मशिन व १५ हजारांची कटिंग मशिन असा ९६,४०० रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त केला. याप्रकरणी तोफखाना पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला.
पोलिस पथकाने दुसऱ्या कारवाईत माणकर गल्ली जिव्हेश्वर पान स्टॉल येथे छापा घातला असता संजय मुरलीधर व्यवहारे (वय ५२ रा. पाण्याची टाकीजवळ, भूषणनगर केडगाव ता. जि. अहिल्यानगर) याला ताब्यात घेतले. त्याची अंगझडती घेतली असता ८ हजार ५०० रुपयांची १० किलो सुगंधीत तंबाखू मिळून आली.
त्याची चौकशी केली असता घरी माणकरगल्ली (ता. जि. अहिल्यानगर) येथे मशीनचा वापर करून
मावा तयार करीत असल्याचे सांगितले. त्याच्या घराची झडती घेतली असता मशिनवर मावा तयार करताना मयूर शंकर उवाळे (वय ३७ वर्षे रा. शिवाजी नगर, कल्याण रोड ता. जि. अहिल्यानगर) गोविंद राधाकिसन मंगलारप (वय ४८ रा. दिल्लीगेट, ता. जि. अहिल्यानगर) मिळून आले. त्यांना विश्वासात घेऊन विचारपूस केली असता आम्ही संजय मुरलीधर व्यवहारे याच्याकडे रोजंदारीने मावा बनविण्यासाठी असल्याचे सांगितले.
हा व्यवसाय संजय व्यवहारे व अमोल मदन सदाफुले (फरार) यांच्या दोघांचा आहे. संजय व्यवहारे याच्या घरातून २ लाख २० हजारांचे मावा तयार करण्याचे २ मशीन, मावा तयार करण्याचे साहित्य व पाच हजारांचे दोन वजन काटे असा एकूण दोन लाख ३३ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. याप्रकरणी तोफखाना पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ही कारवाई पोलिस अधीक्षकांच्या विशेष पथकाचे प्रमुख उपअधीक्षक संतोष खाडे, उपनिरीक्षक राजेंद्र वाघ, पोलिस अंमलदार शंकर चौधरी, अजय साठे, दिगंबर कारखिले, मल्लिकार्जुन बनकर, अरविंद भिंगारदिवे, उमेश खेडकर, सुनिल पवार, दिनेश मोरे, सुनील दिघे, अमोल कांबळे, संभाजी बोराडे, विजय ढाकणे, दीपक जाधव, जालिंदर दहिफळे यांच्या पथकाने केली.