कोपरगाव- जिल्हा पोलीस अधीक्षकांच्या विशेष पथकाने केलेल्या कारवाईत कोपरगावात चार ढंपर व एक ट्रॅक्टरसह अवैध वाळूसाठा जप्त केला आहे. या प्रकरणी पाच जणांवर काल बुधवारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर पाथर्डी येथे देखील अवैध दारू जप्त करण्यात आली आहे.
अहिल्यानगर जिल्ह्यात पोलीस अधीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली परिविक्षाधीन पोलीस उपअधीक्षक संतोष खाडे यांच्या पथकाने काल बुधवारी (दि. १६) पाथर्डी, नेवासा, कोपरगाव, या तालुक्यात अवैध वाळू व बेकायदा दारू पकडून चार डंपर व एक ट्रॅक्टरसह ६१ लाख ७४ हजार ६९० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला असून याप्रकरणी १० जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत पोलीस पथकाने दिलेल्या माहितीनुसार, अहिल्यानगर जिल्ह्यात कोपरगाव तालुका, नेवासा, पाथर्डी पोलीस स्टेशनच्या हद्दीत एकूण ४ गुन्हे दाखल करुन १० आरोपीविरुद्ध कारवाई करुन ६१ हजार ७४ लाख ६९० रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे. यात चार डंपर एक ट्रॅक्टर व पावडी येथे दोन ठिकाणी छाप्यात १६ हजार ६९० रुपयांची दारूचा समावेश आहे.
सदरची कामगिरी जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे, श्रीरामपूर विभागाचे अपर पोलीस अधीक्षक सोमनाथ वाकचौरे, श्रीरामपूर विभाग, शिडीचे उपविभागीय पोलीस अधिकारी शिरीष वमने, शेवगावचे उपविभागीय पोलीस अधिकारी सुनिल पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस अधीक्षक यांच्या विशेष पथकाचे प्रभारी परिविक्षाधीन पोलीस उपअधीक्षक संतोष खाडे, पो.स.ई. राजेंद्र वाघ, पो.हे.कॉ. शंकर चौधरी, अरविंद भिंगारदिवे, अजय साठे, दिगंबर कारखेले, मल्लिकार्जुन बनकर, दिनेश मोरे, उमेश खेडकर, सुनिल पवार, पो.कॉ. सुनिल दिघे, अमोल कांबळे, संभाजी बोराडे, दिपक जाधव, विजय ढाकणे, जालिंदर दहिफळे यांच्या पथकाने केली आहे.