अहिल्यानागर : जिल्ह्यातील पाथर्डी पंचायत समितीच्या रोजगार हमी योजना शाखेतील महिला कर्मचाऱ्यास हटवावे, रोजगार हमीतील विहिरी, गायगोठे प्रकरणे मंजूर करावेत, ग्रामस्वंयम रोजगाराला चांगली वागणूक द्यावी, दलालांना बसायला खुर्ची दिली जाते आणि सरपंच व रोजगार सेवक यांना उभे केले जाते, अशा तक्रारी करीत महाराष्ट्र राज्य ग्रामरोजगार सहाय्यक कर्मचारी संघटनेच्या वतीने पंचायत समिती कार्यालयावर पोतराजासाह डफडे बजाव आंदोलन केले.
तुमच्या मागणयांबाबत चौकशी करुन आठ दिवसांत निर्णय घेतला जाईल, असे प्रभारी गटविकास अधिकारी संगिता पालवे यांनी आश्वासन दिले. त्यानंतर मोर्चा मागे घेण्यात आला. संघटनेचे अध्यक्ष रामराव बडे यांच्या नेतृत्वाखाली मोर्चा काढण्यात आला होता. या वेळी बोलताना रामराव बडे म्हणाले, पंचायत समितीच्या रोजगार हमी कक्षात दिल्या घेतल्याशिवाय काहीच होत नाही. येथील महिला कर्मचारी उद्धट बोलतात. येथे दलाल आल्यावर बसायला खुर्ची दिली जाते. सरपंच व पदाधिकाऱ्यांना उभे केले जाते. ग्रामरोजगार सेवकाला हाकलून दिले जाते. महिला कर्मचाऱ्याची बदली होईपर्यंत आम्ही रोजगार हमी कक्षात येणार नाहीत.

बदली झालीच पाहिजे. पंचायत समितीमधील भ्रष्टाचार संपला पाहिजे. या वेळी मोर्चेकऱ्यांसमोर बोलताना गटविकास अधिकारी संगीता पालवे म्हणाल्या, तुमची तक्रार वाचली आहे. संबधीत कर्मचरी महिलेला नोटीस बजावली आहे. त्यांचे उत्तर ऐकून घेतले जाईल, त्यानंतर चौकशी करून आठ दिवसांत कारवाई करू असे आश्वासन दिले. दरम्यान पंचायत समितीमधील रोजगार हमी शाखेतील विहिरी, गायगोठे, यासाठी पैशांची मागणी केली जाते.
अनेकांचे मोबाईल रेकॉर्ड तपासले तर त्यातून सत्य बाहेर येईल. अनेक दलाल तेथे येऊन पैसे देऊनकामे मंजूर करून घेतात. याची चौकशी झाली पाहिजे. यापूर्वीही अनेकांनी अशा स्वरुपाच्या तक्रारी केल्या आहेत. शेतकऱ्यांची अडवणूक होत आहे. तालुक्यातील विरोधी पक्ष निष्प्रभ झालेला आहे. सत्ताधारी कोणाचेही अधिकाऱ्यांवर नियंत्रण नाही. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी चौकशी केल्यास सत्य समोर येईल, अशी मागणी आंदोलकांनी केली आहे.