राहुरी- राहुरी रेल्वे स्टेशनवर महत्त्वाच्या रेल्वेंना थांबा द्यावा, अशी मागणी पुणे येथील रेल्वे सल्लागार समितीच्या सभेत निवेदन देऊन करण्यात आली आहे.
मध्य रेल्वेच्या पुणे रेल्वे विभागीय सल्लागार समितीची बैठक नुकतीच पार पडली. यावेळी सल्लागार समितीचे सदस्य रणजीत श्रीगोड व डॉ. गोरख बारहाते, ग्राहक पंचायतीचे दत्तात्रय काशीद यांनी पुणे विभागाचे विभागीय वाणिज्य रेल्वे व्यवस्थापक अनिल कुमार पाठक यांना निवेदन देऊन चर्चा केली. मध्यंतरी माजी संसद सदस्य प्रसाद तनपुरे यांनी राहुरी रेल्वे स्टेशन विकसित करणे व महत्त्वाच्या रेल्वेला थांबा मिळणेबाबत रेल्वे प्रशासनाबद्दल तीव्र नाराजी व्यक्त केली होती व दुर्लक्ष झाल्यास आंदोलनाचा इशारा दिला आहे.

याकडे शिष्टमंडळाने चर्चा करून वाणिज्य व्यवस्थापक पाठक यांना राहुरी रेल्वे स्टेशन हे दौंड मनमाड रेल्वे मार्गावरील महत्त्वाचे रेल्वे स्टेशन असून महात्मा फुले कृषी विद्यापीठ, शुगर मिल्स, स्टेशनचे आसपास १५ गावे जोडली गेलेली आहेत. जिथे आंदोलन सुरू तेथे थांबा असा अनुभव असल्याने आम्ही आजपर्यंत शांततापूर्वक मागणी करीत आहोत. मग रेल रोको आंदोलन करावे का?, अशी अपेक्षा असेल तर ते देखील करू, असा इशारा माजी संसद सदस्य प्रसाद तनपुरे यांनी दिला आहे.
साईनगर दादर, साईनगर पंढरपूर, पुणे अमरावती, महाराष्ट्र एक्सप्रेसला प्रथम आग्रक्रमाने थांबा द्यावा, अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे. भविष्यात शनिशिंगणापूर रेल्वे प्रस्तावित असल्याने राहुरी रेल्वे स्टेशनचे महत्त्व वाढणार आहे. नवीन पॅसेंजर व डेमू रेल्वे सुरू करण्याची मागणी ग्राहक पंचायतीचे संघटक दत्तात्रय काशीद यांनी करून अधिकाऱ्यांचे लक्ष वेधले आहे. थांबा बाबत वरिष्ठ कार्यालयाकडे प्रस्ताव देण्यात येणार आहे.