Ahilyanagar News: अहिल्यानगर- शहरातील नालेगाव, गाडगीळ पटांगण, चितळे रोड, दिल्ली गेट, गांधी मैदान या परिसरामध्ये मोकाट कुत्रे टोळक्याने फिरत असल्यामुळे नागरिकांमध्ये दहशत निर्माण होऊन त्रस्त झाले आहे. कुत्र्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत असून, नागरिकांना रस्त्यावरून फिरणे देखील कठीण झाले आहे. लहान मुलांवर अक्षरशा कुत्र्यांची टोळकी हल्ला करीत आहेत. दोन दिवसांपूर्वी माझ्या पाच वर्षाच्या मुलावर कुत्र्याने हल्ला केला. त्याला जिल्हा रुग्णालयात रेबीज लस देण्यात येत आहे.
महापालिकेत मोकाट कुत्रे सोडण्याचा इशारा
महापालिका प्रशासनाने मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त न केल्यास येत्या दोन दिवसांत महापालिकेत मोकाट कुत्रे सोडण्याचा इशारा सामाजिक कार्यकर्ते विकी वाघ यांनी दिला. शहरातील मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त करण्यासंदर्भात उपायुक्त विजयकुमार मुंडे यांना नालेगाव ग्रामस्थ निवेदन देण्यात आले. यावेळी प्रा. माणिकराव विधाते, सुरेश बनसोडे, भैय्या रोहकले, राकेश मिसाळ, गौरव सुरसे, गणेश दातरंगे, पै. अनिल वाणी, दत्ता वामन, अनिरुद्ध भोर, अक्षय पवार, संदीप ठाणगे, करण लांडे, बंटी काकडे, शिवम भंडारी, अतुल कावळे, अण्णा नायर, शुभम कावळे, मंथन चव्हाण, प्रसाद कपिले आदी उपस्थित होते.

महापालिकेने तातडीने कुत्र्यांचा बंदोबस्त करावा
प्रा. माणिकराव विधाते म्हणाले की, नालेगाव येथे विकी वाघ यांच्या पाच वर्षाच्या मुलावर मोकाट कुत्र्याने हल्ला केला आहे. महापालिकेच्या ढिसाळ कारभारामुळे नागरिकांना विविध संकटांना सामोरे जावे लागत आहे. आता गेल्या दोन वर्षापासून महापालिकेवर प्रशासक राज असून, त्यांनी नगरसेवकांसारखे काम करणे गरजेचे आहे. मात्र, त्यांच्याकडून चांगले काम होता ना दिसत नाही. कुत्र्यांच्या त्रासाला नागरिक कंटाळले आहे, तरी महापालिकेने कुत्र्यांचा बंदोबस्त तातडीने करणे गरजेचे आहे.
आयुक्त, उपायुक्तांना इशारा
सुरेश बनसोडे म्हणाले की, शहरात दररोज कुत्रे नागरिकांना चावा घेत आहे. गोरगरीब जनता या गोष्टीबाबत कोणाकडे न्याय मागतील, यापुढील काळात जर शहरात कुत्र्यांनी नागरिकांचा चावा घेतल्यास महापालिकेमध्ये हिंसक कुत्रे आणून आयुक्त, उपायुक्त यांच्या अंगावर सोडले जातील. कुठल्याही प्रकारे शहरात कुत्रे पकडले जात नसून, त्यांच्यावर कुठलीही शस्त्रक्रिया केली जात नसल्यामुळे कुत्र्यांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे.