कर्जत : श्रीगोंदा आगाराची कर्जत – बेलवंडी एसटी बस बंद केल्यामुळे या मार्गावरील विद्यार्थ्यांना पायपीट करावी लागत आहे तर काही विद्यार्थ्यांना खासगी वाहनाने प्रवास करावा लागत आहे तर काहींनी शिक्षण सोडले आहे. त्यामुळे बंद केलेली एसटी सुरु करावी, अशी मागणी काल वाहतूक नियंत्रक कर्जत यांच्याकडे केली आहे.
श्रीगोंदा आगाराच्या मनमानी कारभारामुळे गेल्या वर्षभरापासून कर्जत – बेलवंडी ही एसटी बस बंद आहे. यामुळे बेलवंडी, राक्षसवाडी बुद्रुक, धालवडी या भागातील विद्यार्थ्यांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. राक्षसवाडी बुद्रुक येथील जनता विद्यालय, कुळधरण येथील नूतन मराठी विद्यालय, तसेच कर्जत येथील दादा पाटील महाविद्यालय महात्मा गांधी विद्यालय, समर्थ विद्यालय येथे शिक्षणासाठी विद्यार्थी येत होते.

मात्र, श्रीगोंदा आगाराच्या मनमानी कारभारामुळे गेल्या वर्षभरापासून कर्जत- बेलवंडी ही एसटी बंद केली आहे. या भागातील ग्रामस्थांनी तसेच पालकांनी ही एसटी बस सुरू व्हावी, यासाठी अनेकवेळा पत्रव्यवहार केला; परंतु श्रीगोंदा आगाराचे अधिकारी व कर्मचाऱ्यांनी प्रतिसाद दिला नाही. बेलवंडी, राक्षसवाडी बुद्रुक व धालवडी येथील काही विद्यार्थी आपला जीव धोक्यात घालून मोटारसायकलवर प्रवास करत आहेत तर काही भेटेल त्या वाहनाला हात करुन शाळेला जात आहेत, तर काहींनी शाळा सोडली आहे.
कर्जत-बेलवंडी ही एसटी सुरू व्हावी, या मागणीसाठी काल कर्जतचे वाहतूक नियंत्रक संजय खराडे यांना निवेदन दिले. या वेळी राक्षसवाडी बुद्रुकचे सरपंच बाळासाहेब श्रीराम, युवक नेते सुदर्शन आदी उपस्थित होते. श्रीगोंदा आगाराने या मागणीची दखल घेतली नाही तर कुळधरण येथे एसटी रोको आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे.
राज्य सरकार विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी अनेक उपाययोजना करत आहे. मात्र, महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाचे अधिकारी व कर्मचारी याकडे गांभीर्याने घेत नाहीत, ही मोठी शोकांतिका आहे, एसटी बस बंद झाल्याने मोठी गैरसोय झाली आहे, काहींना तर शिक्षण सोडण्याची वेळ आली आहे, हे मोठे दुर्दैव आहे.
– सुदर्शन कोपनर, युवक नेते, राक्षसवाडी बुद्रुक