Ahilyanagar News : विखे पाटील कुटुंबाच्या अथक प्रयत्नांमुळे गोर गरीबांच्या निवाऱ्याच्या स्वप्नाला प्रत्यक्ष आकार येणार आहे. सावळीविहीर बुद्रुक गावात सामाजिक समरसतेसह विकासाचे नवे पर्व सुरू होणार आहे. ४५० कुटुंबांना प्रत्येकी अर्धा गुंठा जमिनीचा हक्काचा निवारा मिळणार असल्याची माहिती सरपंच उमेश साहेबराव जपे व उपसरपंच विकास जपे यांनी दिली.
पत्रकात म्हटले, की गोरगरीबांच्या आयुष्यात स्थिरता यावी, त्यांना हक्काचा निवारा मिळावा यासाठी सावळीविहीर बुद्रुक ग्रामपंचायतीसाठी २८ एकर शासकीय जमीन गावठाणासाठी उपलब्ध करून देण्यात आली आहे.

ही जमीन पालकमंत्री राधाकृष्ण विखे, विखे कारखान्याचे चेअरमन डॉ. सुजय विखे आणि जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा शालिनीताई विखे यांच्या अथक प्रयत्नांतून आणि जनहिताच्या भूमिकेतून शेती महामंडळाकडून उपलब्ध करून देण्यात आली आहे.
ही २८ एकर जमीन ग्रामपंचायतीच्या नावे देण्यात आली असून तिची साफसफाईही पूर्ण करण्यात आली आहे. लवकरच या जमिनीचे मोजमाप करून प्रत्येकी अर्धा गुंठा या प्रमाणात वाटप करण्यात येणार आहे. सुमारे ४५० गोरगरीब लाभार्थ्यांना हक्काची जागा मिळणार आहे.
घरकुल योजनेसह रस्ते, पिण्याचे पाणी, वीज, अंगणवाडी, शाळा, पाण्याच्या टाक्या आदी सुविधा त्या परिसरात उभारण्यात येणार आहेत. याशिवाय सर्व धर्मियांच्या गरजांचीही विशेष काळजी घेण्यात आली असून मुस्लिम समाजासाठी कब्रस्तान, ख्रिश्चन समाजासाठी दफनभूमी व इतर धर्मियांसाठी स्मशानभूमीसाठीही स्वतंत्र जागा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. लवकरच हक्काची जमीन मिळणार असल्याने सावळीविहीर बुद्रुक गावात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.