अहिल्यानगर : शेअर ट्रेडिंग कंपन्याच्या माध्यमातून गुंतवणूकदारांना भरघोस परतावा देण्याचा आमिष दाखवून मोठ्या प्रमाणात फसवणूक झाली आहे. त्यात ठेवीदारांचे कोट्यवधी रुपये गुंतले आहेत. अहिल्यानगर जिल्ह्यात सर्वाधिक आर्थिक फसवणुकीचे गुन्हे दाखल झाले आहेत.
त्यात जादा परताव्याचे आमिष दाखवून कंपन्या ठेवीदारांकडून रक्कम घेतात आणि पोलिसांच्या तावडीत येण्याआधीच पळून जातात. अशा घटनांना आळा घालण्यासाठी जिल्ह्यातील अशा कंपन्यांचा शोध घेऊन त्यांची कायदेशीर प्रक्रिया तपासून सुमोटो गुन्हे दाखल करण्याचे निर्देश नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक दत्तात्रय कराळे यांनी दिले आहेत.

गुरूवारी (दि. ३१) पोलीस अधीक्षक कार्यालयात जिल्ह्यातील गुन्हेगारी व प्रशासकीय कामकाजाचा त्यांनी आढावा घेतला. यावेळी ते बोलत होते. या बैठकीत त्यांनी जिल्ह्यातील गुन्हेगारीचा आढावा घेतला. तसेच, आगामी सण-उत्सव, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका, प्रलंबित गुन्ह्यांचा निपटारा, तसेच आर्थिक व सायबर गुन्ह्यांच्या वाढत्या प्रमाणावर नियंत्रण या विषयांवर चर्चा करण्यात आली.
कराळे यांनी शेवगाव शेअर मार्केट, शिर्डी, राहाता येथील ग्रो मोअर, तसेच अहिल्यानगर, श्रीगोंदा, पारनेर तालुक्यातील इन्फिनिटी, सिस्पे यांसारख्या फसवणूक प्रकरणांच्या दाखल गुन्ह्यांच्या तपासाची माहिती आर्थिक गुन्हे शाखेकडून घेतली. गुंतवणूक केल्यास जादा परतावा देण्याचे आमिष दाखवून अनेक नागरिकांची फसवणूक केली जात आहे.
अनेक वेळा ही फसवणूक लक्षात येईपर्यंत संबंधित कंपनीचे संचालक पसार होतात. त्यामुळे पोलिसांनी आपल्या हद्दीत अशा कोणत्या संस्था कार्यरत आहेत, त्यांच्याकडून नागरिकांना कशा प्रकारे आमिष दाखवले जात आहे, याची वेळीच चौकशी करून आवश्यक असल्यास त्यांच्या विरोधात सुमोटो गुन्हा दाखल करावा, असे स्पष्ट निर्देश कराळे यांनी दिले.