Ahilyanagar News : पाथर्डी- जिल्हा पोलीस प्रमुखांच्या विशेष पथकाने माणिकदौंडी येथे छापा टाकून जुगार खेळणाऱ्या दहा जणांना ताब्यात घेऊन सात वाहने व ४६ हजार पाचशे रुपये रोख, असा अकरा लाख ६१ हजार पाचशे रुपयांचा ऐवज जप्त केला आहे.
विशेष पोलीस पथकाला गुप्त बातमीदारामार्फत मिळालेल्या माहितीनुसार पथकातील सुनील पवार, दिनेश मोरे, दिगंबर कारखेले, मल्लिकार्जुन बनकर, उमेश खेडकर, अजय साठे, दीपक जाधव, विजय ढाकणे, जालिंदर दहिफळे, अमोल कांबळे यांनी माणिकदौंडी येथे आशिर पठाण यांच्या शेतामध्ये पत्र्याच्या शेडमध्ये चालू असलेल्या जुगाराच्या अड्ड्यावर छापा मारला. या वेळी ४६ हजार पाचशे रुपये रोख जप्त करण्यात आले तर एक बलेनो गाडी व पाच मोटारसायकली व सात मोबाईल पोलिसांनी हस्तगत केले आहेत. जुगार खेळणाऱ्या दहा जणांना ताब्यात घेतले आहे.

पोलिसांनी जुगारावर छापा टाकून केलेली ही मोठी कारवाई आहे. तालुक्यातील अवैध व्यवसायांवर कारवाई करण्यासाठी जिल्हा पोलीस प्रमुख सोमनाथ घार्गे यांनी तयार केलेल्या पथकांनी ही कारवाई पाथर्डी पोलिसांच्या मदतीने केली आहे. पोलिसांनी ११ लाख ६१ हजार पाचशे रुपयांचा ऐवज जप्त केला असल्याची माहिती पोलीस निरीक्षक विलास पुजारी यांनी दिली.
रात्री, उशिरापर्यंत याबाबत गुन्हा नोंद करण्याची प्रक्रिया चालू होती. तालुक्यातील जुगार अड्डे कोणत्या प्रकारे चालतात, याचा हा उत्तम नमुना आहे. पोलिसांच्या कारवाईमुळे जुगार व माव्यामध्ये लाखो रुपयांची कमाई करणारे येथील अवैध व्यावसायिक यामुळे चांगलेच धास्तावले आहेत.