राहुरी- स्वाभिमानी शेतकरी संघटनेने नाफेडमार्फत कांद्याला प्रतीक्विंटल २००० रुपये हमीभाव मिळावा आणि शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी करण्यात यावी, अशी ठाम मागणी केली आहे. या मागणीचे निवेदन संघटनेचे जिल्हाध्यक्ष रवींद्र मोरे यांनी नुकतेच राहुरी येथे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना सादर केले.
उपमुख्यमंत्री पवार राहुरी येथील बाजार समितीमधील एका कार्यक्रमासाठी आले असता, त्यावेळी त्यांना हे निवेदन देण्यात आले. शासनाने तातडीने शेतकऱ्यांकडील कांदा नाफेडमार्फत प्रती क्विंटल २००० रुपये दराने खरेदी करावा, कांदा निर्यातीवर प्रती किंटल १००० रुपये अनुदान द्यावे, तसेच नाफेडची कांदा खरेदी केंद्रे वाढवावीत, अशी संघटनेने जोरदार मागणी केली आहे.

यासोबतच, शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करून त्यांची संपूर्ण कर्जमाफी करावी, असेही निवेदनात स्पष्टपणे नमूद करण्यात आले आहे. या निवेदनप्रसंगी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष रवींद्र मोरे यांच्यासह प्रकाश देठे, बाळासाहेब जाधव, आनंद वने, सचिन म्हसे, रविकीरन दुस, धनंजय लहारे, किशोर वराळे, सतीश पवार, प्रमोद पवार, निलेश लांबे, सुनील आगळे हे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.