पाथर्डी शहरातील पगारे वस्ती येथील वंदना विनोद मगर व कैलास प्रभाकर पगारे यांच्या वडिलोपार्जित जागेत अतिक्रमण करून शासनाने मंजूर केलेले घरकुल बांधण्यात आले असून, सदर अतिक्रमण काढून टाकावे व संबंधितांवर कारवाई करून आम्हाला न्याय द्यावा, अशी मागणी वंदना मगर यांनी नगरपरिषदेचे मुख्याधिकारी संतोष लांडगे यांच्याकडे केली आहे. मला न्याय न मिळाल्यास दि. १६ जुलै रोजी नगरपरिषद कार्यालयासमोर आपण आमरण उपोषण करण्याचा इशारा मगर यांनी दिला आहे.
मगर यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, माझे वडील नामे कै. प्रभाकर पगारे व आई इंदुबाई पगारे मयत असून, त्यांच्या मालकीची आमची वडिलोपार्जित असलेली सिटी स. नं. ११०७ मध्ये १ गुंठा जागेवर आमच्या नावे वारस म्हणून वंदना विनोद मगर व कैलास प्रभाकर पगारे अशी नोंद लागलेली आहे. मी सध्या सालवडगाव, ता. शेवगाव येथे राहत असून, सदर माझ्या वडिलोपार्जित जागेवर आम्हाला कुठल्याही प्रकारची कल्पना न देता व जाणीवपूर्वक शेजारील व्यक्तीने अतिक्रमण करून शासनाने मंजूर केलेले घरकुलाचे बांधकाम केले आहे.

सदर व्यक्तींच्या नावे कुठलाही पुरावा नसताना व सदर व्यक्तीचा सिटी स.नं. ११२१, ११२२ असा असून, त्यांना फक्त अर्धा गुंठा जागा आहे. तरी त्या जागेवर त्यांचे पूर्वीचेच बांधकाम आहे. त्यांना उर्वरित जागा शिल्लक नाही, तरी सदर व्यक्तींनी नगर परिषद कर्मचाऱ्यांना हाताशी धरून संगणमताने माझ्या जागेत विनापरवाना बेकायदेशीर घरकुल बांधकाम केले आहे.
याबाबत नगरपरिषद कार्यालयात न्याय मागण्यासाठी गेलो असता, आम्हाला उडवाउडवीची उत्तरे देऊन व अरेरावीची भाषा केली व काय करायचे ते करा, असा दम दिला. अतिक्रमण करणारे यांनीसुद्धा मला त्या जागेवर येण्यास विरोध करून दमबाजी केलेली आहे. सदर अतिक्रमण हटवून मला न्याय मिळावा, यासाठी मी आपल्या कार्यालयासमोर दि. १६ जुलै रोजी आमरण उपोषणास बसणार आहे.
हा नगरपरिषदेचा अनागोंदी व गलथान कारभार असून, कर्मचाऱ्यांनी संगणमताने कागदपत्रांची कोणतीही पाहणी तपासणी न करता केलेला भ्रष्टाचार आहे. याबाबत वरिष्ठांनी लक्ष घालून, असे प्रकार थांबवावे व आम्हाला न्याय द्यावा. याबाबत सखोल चौकशी केली तर या योजनेत अनेक गैरप्रकार उघडकीस येतील