कर्जत- कर्जतचे ग्रामदैवत श्री संत सद्गुरू गोदड महाराज यांचा जन्मोत्सव सोहळा दि. ४ ऑगस्ट रोजी कर्जत येथे जन्मस्थळी व समाधीस्थळी या दोन्ही ठिकाणी उत्साहात साजरा होणार आहे, या पार्श्वभूमीवर या सोहळ्याची जोरदार तयारी सुरू आहे. यादिवशी कर्जत येथे लाखो भाविक भक्तांना कर्जतच्या शिपी – आमटी- चपाती या महाप्रसादाचा लाभ होणार आहे.
कर्जतचे ग्रामदैवत श्री संत गोदड महाराजांचा जन्मोत्सव सोहळा चार ऑगष्ट रोजी कर्जत येथील जन्मस्थळी व समाधीस्थळी साजरा करण्यात येणार आहे. या पार्श्वभूमीवर दोन्ही ठिकाणी तयारीसाठी नियोजन बैठका पार पडल्या असून, या सोहयाची जोरदार तयारी सुरू असून, भव्य मंडप उभारण्याचे काम सुरू आहे.

श्री संत गोदड महाराजांचे जन्मस्थळ असलेल्या कर्जत येथील पाटील गल्ली येथील जन्मोत्सव सोहळ्याचे निमंत्रक प्रवीण घुले पाटील यांनी पंचक्रोशीतील ग्रामस्थ व कार्यकर्ते यांची नियोजन बैठक घेतली. ४ ऑगष्ट रोजी श्री गोदड महाराजांच्या जन्माचे स्वागत करण्यासाठी कर्जतकरांनी आपापल्या दारात सडा टाकावा, रांगोळी काढावी, दारावर तोरण बांधावे व घरावर गुढी उभारावी, असे आवाहन करण्यात आले आहे.
जन्मस्थळी हभप दयानंद महाराज कोरेगावकर यांचे कीर्तन होणार आहे. श्री संत गोदड महाराजांचे समाधी स्थळ असलेल्या गोदड महाराज मंदिरात जन्मोत्सव सोहळ्याच्या तयारीसाठी ग्रामस्थ, गावकरी, मानकरी, पुजारी व व्यापाऱ्यांची बैठक पार पडली. दि. १ ऑगस्ट ते तीन ऑगस्ट या कालावधीत श्री संत गोदड महाराजांचे चरित्र वाचन होणार आहे. समाधीस्थळी हभप माऊली महाराज पठाडे यांचे कीर्तन होणार आहे.
श्री संत गोदड महाराजांच जन्मोत्सव सोहळा सोमवार (दि.४) ऑगष्ट रोजी म्हणजे कर्जतच्या आठवडे बाजारच्या दिवशी असल्यामुळे कर्जतच्या आठवडे बाजारचे ठिकाण बदलण्यात आले असून, आठवडे बाजार कर्जत – मिरजगाव रोडलगत असलेल्या फाळके पेट्रोल पंपाशेजारील मैदानात भरणार आहे. यांची शेतकरी, व्यावसायिक, ग्राहक व नागरिकांनी घ्यावी असे आवाहन कर्जत नगरपंचायतीच्या नगराध्यक्षा रोहिणी सचिन घुले व उपनगराध्यक्ष संतोष म्हेत्रे यांनी केले आहे. संत गोदड महाराजांच्या जन्मोत्सव सोहळ्यास भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन त्यांनी केले आहे.