श्रीगोंदा- तालुक्यातील घोगरगाव येथील तरुणाशी एजंटच्या मदतीने तीन लाख रुपये घेत बनावट लग्न करून काही दिवस राहून घरातील रोख रक्क्म चोरुन घेऊन जाणाऱ्या बनावट नवरीसह नवरीच्या मावस भावाची भूमिका निभावणाऱ्या आकाश तोताराम सुरोशे (वय३१ वर्षे रा. दहिद बुद्रुक ता.जि. बुलढाणा) या दोघांना श्रीगोंदा पोलिसांनी जेरबंद करत बनावट लग्न करुन फसवणाऱ्या अंतरराज्यीय टोळीचा पर्दाफाश केला. या प्रकरणातील शिवाजी राठोड, ऋषाली ठाकूर, सुरोशे (पूर्ण नाव माहीत नाही) हे तीनजण पसार आहेत.
यातील बनावट नवरी आणि तिचा मावस भाऊ आकाश सुरोशे या दोघांवर (धांबोळा, जि. डुंगरपूर, राजस्थान) येथे देखील फसवणुकीचा गुन्हा दाखल आहे. या बाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार घोगरगांव येथील रोहित रमेश तरटे (वय २८ वर्षे), या तरुणासोबत बुलढाणा परिसरातील तरुणीशी मध्यस्थांच्या माध्यमातून बनावट तयार केलेले नातेवाईक यांनी तीन लाख रुपये घेत १४ डिसेंबर २०२४ रोजी आळंदी देवाची, पुणे येथे साध्या पद्धतीने लग्न लावले.

लग्नानंतर बनावट नवरीने काही दिवस राहुन घरातील रोख रक्कम चोरत बनावट नवरी पळून गेली. लग्नानंतर सहा महिन्यांनी फसवणूक झाल्याचे लक्षात आल्याने रोहित तरटे याने श्रीगोंदा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला.
श्रीगोंदा पोलिसांनी गुन्ह्याचा तांत्रिक तसेच गुप्त बातमी दारामार्फत तपास करत बनावट नवरी तसेच मावस भावाचा भूमिका करणारा आकाश तोताराम सुरोशे या दोघांना बुलढाणा तसेच संभाजीनगर येथून सापळा रचुन १४ जुलै रोजी ताब्यात घेतले. त्यांचेकडे अधिक तपास करत त्यांच्यासह इतर तीन जणांचा गुन्हयामध्ये सहभाग असल्याचे निष्पन्न करत बनावट लग्न करुन फसवणाऱ्या अंतरराज्यीय टोळीचा पर्दाफाश केला.
अटक केलेल्या दोघांना न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने चार दिवसांची पोलिस कोठडी सुनावली. सदरची कारवाई पोलीस निरीक्षक किरण शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस कर्मचारी संग्राम जाधव, संदिप शिरसाठ, रवि जाधव, संदिप राऊत, अरुण पवार, संदिप आजबे, मयुर तोरडमल, अलका वाघ यांनी केली