अहिल्यानगर- बीपीसीएल कंपनीने ग्रामपंचायतीला नुकसान भरपाई पोटी वर्ग केलेल्या पैशाचा गैरव्यवहार थांबवावा, नागरदेवळे गावठाणमधील अमरधाम दुरुस्ती व्हावी, गावाला पूर्णवेळ ग्रामसेवक मिळावा, प्रशासक म्हणून ग्रामविस्तार अधिकारी यांची नियुक्ती व्हावी या प्रमुख मागण्यांसाठी जिल्हा परिषद येथे ग्रामस्थांनी अमरण उपोषण केले. या मागणीची दखल घेऊन उपमुख्य कार्यकारी अधिकारी दादाभाऊ गुंजाळ यांनी लेखी आश्वासन दिल्याने उपोषण तिसऱ्या दिवशी मागे घेण्यात आले.
यावेळी उपोषणकर्ते निखिल शेलार, सुशील कदम, सागर खरपुडे, सागर चाबुकस्वार, मुकेश झोडगे, राजेश धाडगे आदींनी ज्यूस पिऊन उपोषण सोडले. यावेळी माजी जि.प. सदस्य शरद झोडगे, संदेश कार्ले, माजी सभापती रामदास भोर, प्रकाश पोटे, अथर खान, अजित दळवी, समीर पठाण, कैलास पगारे, रामेश्वर निमसे, मच्छिद्र बेरड, योगेश धाडगे, जालिंदर बोरुडे, निलेश दळवी, सोनू बिने, रविंद्र धाडगे आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते.

नागरदेवळे येथील ग्रामपंचायत हद्दीमधील घरगुती गॅस लाईन खोदकामाच्या नुकसान भरपाई बी.पी.सी.एल. कंपनीकडे शुल्क मागणीत व बी.पी.सी.एल कंपनीने ग्रामपंचायतीला नुकसान भरपाई पोटी वर्ग केलेल्या पैशाच्या गैरव्यवहार थांबवण्याची मागणी ग्रामस्थांनी केली.
गावठाण अमरधाम दुरुस्त व्हावी, गावाला पूर्णवेळ ग्रामसेवक व प्रशासक म्हणून ग्रामपंचायत विभागाचा ग्राम विस्तार अधिकाऱ्यांची नियुक्ती व्हावी, कचरा गाड्या चोरी, एलईडी टीव्ही खरेदी घोटाळा तसेच कामाचे टेंडर न करता पैसे काढणे, या तक्रारीचे निरसन् करण्यासाठी गटविकास अधिकारी व ग्रामपंचायत अधिकारी यांच्या चौकशी संदर्भात तालुकास्तरीय समिती नेमण्याचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी यांनी लेखी आदेश दिले आहेत, असे उपोषणकर्त्यांने सांगितले.