Ahilyanagar News: अहिल्यानगर- जिल्ह्यातील अनेक गावांमध्ये विवाहयोग्य तरुण-तरुणींची लग्ने रखडल्याने एक गंभीर सामाजिक प्रश्न निर्माण झाला आहे. विशेषतः लग्नासाठी योग्य वयात आल्यावर मुली न मिळाल्याने मुलांची लग्ने होत नाहीत, या गोष्टीचा थेट परिणाम आता प्राथमिक शाळांच्या पटसंख्येवर होऊ लागला आहे. पहिलीत नवीन दाखल होणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या ही दिवसेंदिवस दिवस घटू लागली असून, शिक्षण क्षेत्रातही आता चिंतेचे वातावरण पसरले आहे.
वेळेत लग्न न झाल्यामुळे शाळेवर दूरगामी परिणाम
तालुक्यासह जिल्ह्यातील अनेक छोट्या मोठ्या तसेच महसुली गावांमध्येही ही समस्या मोठ्या प्रमाणात दिसून येत आहे. वाढत्या शहरीकरणामुळे आणि काही प्रमाणात लिंग गुणोत्तरातील असंतुलनामुळे विवाहयोग्य मुलींची उपलब्धता कमी झाली आहे. याचा परिणाम म्हणून अनेक तरुण मुलांची लग्ने वेळेवर होत नाहीत. ही केवळ एक सामाजिक समस्या राहिली नसून, त्याचे दूरगामी परिणाम आता शिक्षण व्यवस्थेवरही दिसू लागले आहेत.

पहिलीत येणाऱ्या विद्यार्थ्यांच्या संख्येत घट
मागील काही वर्षांपासून पहिलीत दाखल होणाऱ्या विद्यार्थ्यांच्या संख्येत लक्षणीय घट झाली आहे. ज्या घरात तरुण मुलांची लग्ने झालेली नाहीत, त्या घरांमध्ये साहजिकच नवीन पिढी जन्माला येत नाही, त्यामुळे गावातील लहान मुलांची संख्या कमी होत आहे. ज्याचा थेट परिणाम शाळांच्या पटसंख्येवर होत आहे. अनेक शाळांमध्ये नवीन प्रवेश जवळपास थांबले आहेत, तर काही शाळांमध्ये पटसंख्या इतकी घटली आहे. की त्यांचे भवितव्यच धोक्यात आले आहे. या परिस्थितीमुळे केवळ शाळांची पटसंख्याच घटत नाही, तर गावातील सामाजिक आणि आर्थिक जीवनावरही याचा परिणाम होत आहे.
भविष्यात समस्या गंभीर बनणार
तरुण पिढीचे स्थलांतर, वाढत्या वयातील अविवाहित तरुणांची संख्या आणि त्यातून निर्माण होणारे इतर सामाजिक प्रश्न, यामुळे गावांच्या विकासालाही खीळ बसत आहे. या गंभीर समस्येवर तातडीने उपायासाठी सर्व घटकांनी आत्मचिंतन करण्याची गरज आहे. भविष्यात ही समस्या अधिक गंभीर रूप धारण करणार नाही आणि शिक्षण व्यवस्थेवर होणारा नकारात्मक परिणाम थांबवता का येईल, या दृष्टीने विचार होणे गरजेचे आहे.
लग्न जमवतांना आई-बापांच्या जास्त अपेक्षा
लग्न जमविताना माता – पित्यांनी संपत्ती, जमीन जुमला न पाहता मुलांचे कतृत्व पाहून विवाह योग्य मुलाला मुलगी देणे गरजेचे असताना वधू पिता तसे न पाहता संपत्ती पाहिजे, मुलगा शासकीय नोकरदार हवा, अशी अपेक्षा ठेवत असल्याने मुलींचेही लग्नाचे वय ढळून चालले आहे. नोकदाराव्यतिरिक्त एक चांगला व्यावसायिक, उद्योजक, प्रगतशील शेतकरीही चांगला वर असू शकतो, त्यासाठी मनाची विचार शक्ती महत्त्वाची असून, ही बाब वधू पित्याने लक्षात घेणे भविष्याची गरज निर्माण झाली आहे.