कोपरगाव- नगरपालिकेने काही महिन्यांपूर्वी शहरातील सुमारे ८०० अतिक्रमणे हटवण्यासाठी राबवलेल्या मोहिमेवर १० लाख १ हजार ७६१ रुपये इतका खर्च झाला; मात्र आज पुन्हा त्याच ठिकाणी अतिक्रमणाची स्थिती ‘जैसे थे’ झाल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे. या संपूर्ण मोहिमेचा व्यर्थ खर्च जनतेच्या कररुपी पैशातून झाला असल्याने, ही मोहीम काही ठराविक अतिक्रमणधारकांनाच टार्गेट करण्यासाठीच होती का? असा प्रश्नही उपस्थित केला जात आहे.
कोपरगाव शहरात काही महिन्यांपूर्वी राबवलेल्या अतिक्रमण विरोधी मोहिमेत ८०० हून अधिक अतिक्रमणे हटवण्यात आली. यासाठी पालिका निधीतून तब्बल दहा लाख एक हजार ७६१ रुपयांचा खर्च करण्यात आला. या मोहिमेसाठी १४ जेसीबी, ४ डंपर, ४ ट्रॅक्टर, पोलिसांचा बंदोबस्त, पालिकेचे कर्मचारी दिवसाला १३ ते १४ तास कामावर होते. या कारवाईमुळे अनेक नागरिकांचे व्यवसाय, घरांचे दरवाजे, पथारे उद्ध्वस्त झाले. काही जणांचे संसार अक्षरशः उघड्यावर आले.

अतिक्रमण काढताना जी यंत्रणा वापरण्यात आली, त्यासाठी -जी खर्चाची तयारी झाली, ती
मोठ्या प्रमाणावर होती; पण आज पुन्हा तेच अतिक्रमण मूळ जागी उभे राहिले आहे. त्यामुळे संपूर्ण मोहिमेचा हेतू, त्याचा कार्यान्वय आणि खर्च याबाबत प्रचंड शंका निर्माण झाल्या आहेत. अतिक्रमण काढताना नागरिकांनी संयमाने साथ दिली, तरी पुनर्वसनाचा कोणताही ठोस निर्णय पालिकेने घेतलेला नाही. ना खोका शॉप दिले गेले, ना शॉप, ना व्यावसायिकांना पर्यायी व्यवस्था.
प्रशासनाकडे आकडे नाहीत
अतिक्रमण काढण्यासाठी केलेला खर्च अतिक्रमण करणाऱ्यांकडून वसूल करायचा प्रयत्न केला जातो; मात्र या मोहिमेनंतर कोणतीही वसुली झाली का, याची माहिती पालिकेकडे उपलब्ध नाही. पुन्हा त्या जागी अतिक्रमण उभे राहिल्यामुळे हा खर्च व्यर्थ गेला आहे. त्यामुळे ही मोहीम ठराविक अतिक्रमणधारकांना लक्ष्य करण्यासाठीच होती का? हा प्रश्न उभा राहतो.
आश्वासनांचा फोलपणा
विविध राजकीय पक्षांनी बैठका घेतल्या, मुंबईत प्रश्न मांडले, आश्वासने दिली, पण आजवर कोणताही तोडगा निघाला नाही. त्यातच अतिक्रमणधारकांनी पुन्हा आपल्या जागा ताब्यात घेत व्यवसाय सुरू केला आहे. पालिकेच्या स्पीकर व अनाउन्समेंट अंमलात आणले जात नाहीत. काहींना दंड ठोठावण्यात आला, पण अतिक्रमण हटवण्याचे प्रयत्न अपयशी ठरले.
नागरिकांचा रोष आणि पालिकेची बेफिकिरी
नागरिकांनी केलेल्या संयमाच्या प्रतिसादानंतरही, ही मोहीम अपयशी ठरल्याने जनतेत संतापाची भावना निर्माण झाली आहे. कोपरगावात मोकाट जनावरे, श्वाने, गाढवे या समस्याही तितक्याच बिकट आहेत. यावरही पालिकेकडून कोणतीही ठोस कारवाई होत नाही. एकंदरीत शहरातील नागरी समस्या सुटण्याऐवजी अधिकच गंभीर होत आहेत, अशी स्थिती नागरिकांपुढे आहे.