नेवासा- नेवासा नगरपंचायत हद्दीतील प्रधानमंत्री आवास योजनेच्या घरकुल लाभार्थ्यांना दिलासा मिळाला असून तब्बल १ कोटी ५४ लाख रुपयांचे रखडलेले अनुदान लवकरच त्यांच्याकडे वर्ग होणार आहे. याबाबतची माहिती आमदार विठ्ठलराव लंघे यांनी दिली आहे.
अनेक दिवसांपासून रखडलेले हे अनुदान अखेर आमदार लंघे यांच्या सातत्यपूर्ण पाठपुरावा व प्रयत्नांमुळे मोकळे झाले असून, शेकडो लाभार्थ्यांच्या प्रतीक्षेला आता पूर्णविराम मिळणार आहे. नेवासा नगरपंचायतीच्या पहिल्या टप्प्यात ३२४ घरकुले मंजूर झाली होती.

यामध्ये १८२ घरकुलांचे काम पूर्ण झाले असून १४२ घरकुले प्रगतिपथावर आहेत. या सर्व घरकुल लाभाथ्यर्थ्यांचे प्रथम, द्वितीय, तृतीय व चतुर्थ टप्प्यातील अनुदान रखडलेले होते. ही बाब लक्षात घेऊन आमदार लंघे यांनी मुंबई येथे सुरू असलेल्या पावसाळी अधिवेशनात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन प्रत्यक्ष निवेदन दिले.
यावेळी शिंदे यांनी म्हाडा अधिकाऱ्यांना तात्काळ आदेश देऊन कारवाई सुरू करण्याचे निर्देश दिले. त्यानुसार ही रक्कम म्हाडामार्फत लवकरच नगरपंचायतीकडे वर्ग होणार आहे आणि त्यानंतर थेट लाभाथ्यांच्या खात्यावर जमा होईल.
याशिवाय, दुसऱ्या टप्प्यातील ४४ नव्या घरकुल प्रकल्पांनाही मंजुरी मिळाली असून, त्याची प्रक्रिया लवकरच सुरू केली जाणार आहे.
प्रधानमंत्री आवास योजना ही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची देशातील सर्वसामान्यांसाठीची महत्त्वाकांक्षी योजना असून, यामार्फत प्रत्येकाला आपले घर मिळावे, हा सरकारचा उद्देश आहे. तुकडे बंदीची अट शिथिल करण्याच्या निर्णयामुळे अनेकांचे घरकुलाचे स्वप्न आता प्रत्यक्षात उतरू शकणार असून, रखडलेली कामे पूर्णत्वास जातील.
– आ. विठ्ठलराव लंघे