अहिल्यानगर- शहरातील माणिक चौकातील ए. टी. यू. जदीद उर्दु प्राथमिक शाळा शिक्षण संस्थेच्या अध्यक्षांविरुद्ध पाच लाखांची खंडणी मागितल्याच्या आरोपावरून तोफखाना पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. ही घटना ९ जुलै रोजी घडली असून, याप्रकरणी २० जुलै रोजी गुन्हा दाखल झाला.संस्थेचे अध्यक्ष अब्दुल मतीन अब्दुल रहीम (रा. झेड. एम. टॉवर, सिटी लॉन शेजारी सावेडी, अहिल्यानगर), संस्थेच्या स्वीकृत सदस्याचा संशयित आरोपींमध्ये समावेश आहे.
याबाबत शहरातील माणिक चौक येथील ए. टी. यू. जदीद उर्दु प्राथमिक शाळेचे निलंबित मुख्यध्यापक नासिर ख्वाजालाल खान रा. समीरनगर, मुकुंदनगर, अहिल्यानगर यांनी पोलिसांत फिर्याद दिली. फिर्यादीत म्हटले, १५ एप्रिल २०२५ रोजी मला पोस्टाने पत्र मिळाले. त्यात संस्थेने मला मुख्यध्यापक पदावरून निलंबित केले होते. त्या आदेशाविरोधात मुंबई उच्च न्यायालयाच्या
औरंगाबाद खंडपीठात रिट पिटिशन दाखल केले.

त्याचा राग आल्याने संस्थेचे अध्यक्ष अब्दुल मतीन अब्दुल रहीम यांनी माझ्याविरोधात खोटे आरोपाचे पत्रव्यवहार सुरू केले. ९ जुलै रोजी संस्थेचे अध्यक्ष व स्वीकृत सदस्य यांची तहसील कार्यालयातील धर्मादायुक्त कार्यालयात भेट झाली.
वरील दोघांनी माझे निलंबन मागे घेण्यासाठी पाच लाख रुपयांची मागणी केली. पैसे नाही दिले तर तुला कायमचे घरी बसू अशी धमकी दिली. तसेच, प्रसारमाध्यमांमध्ये तुझी बदनामी करू शकतो, असे फिर्यादीत म्हटले. गुन्ह्याचा तपास पोलिस हेडकॉन्स्टेबल चांगदेव आंधळे करीत आहेत.