तळेगाव दिघे- प्रधानमंत्री ग्राम सडक योजने अंतर्गत मजबुतीकरण आणि डांबरीकरण करण्यात आलेला संगमनेर तालुक्यातील सोनोशी, चिंचोली गुरव मार्गे असलेला मालदाड रोड (संगमनेर) ते निहऱ्हाळे डांबरी रस्ता काम पूर्ण होण्यापूर्वीच ठिकठिकाणी उखडला आहे. त्यामुळे सदरच्या निकृष्ट रस्त्याच्या कामाची चौकशी करावी, अशी मागणी राजहंस ट्रान्सपोर्टचे अध्यक्ष हौशीराम सोनवणे यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केली आहे.
या संदर्भात दिलेल्या पत्रकात सोनवणे यांनी म्हटले आहे की, प्रधानमंत्री ग्राम सडक योजने अंतर्गत मालदाड रस्ता (संगमनेर) ते निहऱ्हाळे या आश्विनाथ देवस्थान, चिंचोली गुरव, नान्नज दुमाला, सोनोशी, मालदाड आणि मालदाड रस्ता (संगमनेर) या रस्त्याचे मजबुतीकरण आणि डांबरीकरण काम करण्यात आले.

मात्र, सदर रस्त्याचे काम अद्याप अपूर्ण असतानाच ठिकठिकाणी रस्ता उखडला असून डांबरी रस्त्यावर खड्डे पडू लागले आहेत. काम पूर्ण होण्यापूर्वीच डांबरी रस्ता उखडत असल्याने भविष्यात रस्त्याची काय अवस्था होईल? याचा विचार सबंधित खात्याच्या यंत्रणेने करणे आवश्यक बनले आहे.
चिंचोली गुरव परिसरात सदर डांबरी रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यांची माजी सरपंच योगेश सोनवणे, तुकाराम सोनवणे, लहानू सोनवणे, दिपक सोनवणे, प्रताप सोनवणे, भाऊराव सोनवणे, महेश सोनवणे या कार्यकर्त्यांनी मंगळवारी (दि. ८) प्रत्यक्ष पाहणी केली असता, रस्त्यावरील डांबराचा थर हाताने निघत असल्याचे दिसून आले. त्यामुळे प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेंतर्गतचा सदर रस्त्याचे काम अत्यंत सुमारदर्जाचे करण्यात आल्याचे उघड झाले आहे.
सदर रस्ता कामाची दक्षता व गुणनियंत्रक शाखेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांमार्फत त्वरित चौकशी करावी, अशी मागणी राजहंस ट्रान्सपोर्टचे अध्यक्ष हौशीराम सोनवणे, माजी सरपंच योगेश सोनवणे यांच्यासह कार्यकर्त्यांनी केली आहे.