कर्जत- कर्जत तालुक्यातील राशीन येथील चौकाला क्रांतिसूर्य महात्मा ज्योतीराव फुले चौक, असे नाव कायम ठेवणे व तेथे भगवा ध्वज उभारण्याचा निर्णय काल झालेल्या बैठकीत एकमताने घेण्यात आला. यामुळे गेल्या पंधरा दिवसांपासून सुरू झालेला वाद अखेर मिटला आहे.
सुमारे दहा वर्षांपूर्वी राशीन येथील जुन्या करमाळा चौकाचे महात्मा ज्योतीराव फुले चौक असे नामकरण करण्यात आले. तसा राशीन ग्रामपंचायतीचा ग्रामसभेचा ठराव आहे. मात्र, दि. १३ जुलै रोजी रात्री महात्मा फुले चौकात भगवा ध्वज उभारला, या चौकाचे नामकरण करून छत्रपती संभाजी महाराज चौक करण्यात येणार असल्याची अफवा उठली, यामुळे मराठा व माळी समाजात वाद निर्माण झाला, यावर एकमताने तोडगा काढण्यासाठी प्रशासनाने एक बैठक घेतली.

यामध्ये निर्णय झाला नाही, त्यामुळे गावपातळीवर निर्णय घेण्यासाठी वेळ देण्यात आला होता. राशीन येथे अनेक बैठका झाल्या. या निर्णयासाठी चार जणांचे शिष्टमंडळ तयार करण्यात आले. या शिष्टमंडळाने दोन्हीं बाजूंच्या लोकांशी चर्चा केली. यामध्ये निर्णय घेण्यात आला. त्यानंतर काल कर्जत येथील तहसील कार्यालयात समन्वय बैठक झाली. या वेळी तहसीलदार गुरु बिराजदार, पोलीस निरीक्षक सोपान शिरसाट, सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपअभियंता प्रशांत वाकचौरे, गटविकास अधिकारी अक्षय सूर्यवंशी हे उपस्थित होते.
अखेर या बैठकीत निर्णय घेण्यात आला की, राशीन येथील चौकाला क्रांतीसुर्य महात्मा ज्योतीराव फुले चौक असे नाव कायम ठेवण्यात येणार आहे. शिवाय या चौकात भगवा झेंडा उभारण्यात येणार आहे. या बैठकीला राशीन व परिसरातील कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. या निर्णयामुळे राशीन येथील वादावर अखेर पडदा पडला आहे.