श्रीगोंदा- श्रीगोंदा, पारनेर तसेच राज्यातील विविध भागांत शेअर मार्केटच्या नावाखाली हजारो कोटी रुपयांची गुंतवणूक गोळा करून गुंतवणूकदारांना परतावा आणि मुद्दल देण्यास टाळाटाळ करणाऱ्या नवनाथ आवताडे आणि त्याचे सहकारी संचालक व एजंट यांच्या विरोधात अखेर गुन्हा दाखल झाला आहे. या प्रकरणात पोलिसांनी तत्काळ कारवाई करावी, आरोपींना अटक करून त्यांच्या पारपत्रांची जप्ती करावी, या मागणीसाठी भाजपचे माजी पंचायत समिती सदस्य तथा शेतकरी नेते राजेंद्र म्हस्के यांनी १४ जुलै सोमवारपासून श्रीगोंदा तहसील कार्यालयासमोर उपोषण आंदोलन छेडण्याचा इशारा दिला आहे.
या पार्श्वभूमीवर म्हस्के यांनी शासकीय विश्रामगृहात आयोजित पत्रकार परिषदेत माहिती दिली. त्यांनी सांगितले की, इन्फनाईट बिकॉनसह विविध कंपन्यांच्या माध्यमातून श्रीगोंदा तालुक्यात आणि परिसरात कोट्यवधी रुपयांची फसवणूक करण्यात आली आहे. या कंपन्यांचे मुख्य सूत्रधार नवनाथ आवताडे यांनी जादा परताव्याचे आमिष दाखवून शेकडो गुंतवणूकदारांकडून पैसे गोळा केले.

मात्र, कालांतराने कोणालाही ना परतावा मिळाला, ना मूळ रक्कम. म्हस्के यांनी पुढे सांगितले की, हा आर्थिक घोटाळा २०१५ पासून सुरु असून पारनेर व श्रीगोंदा भागांत नवनाथ आवताडेने नवख्याप्रमाणे प्रवेश करून अनेकांना फसवले. एवढा मोठा आर्थिक गैरव्यवहार होऊन देखील प्रशासन आणि पोलिसांनी याकडे दुर्लक्ष का केले? यामागे कोणाचा आशीर्वाद होता का, हे तपासणे गरजेचे आहे. त्यांनी हा आरोपही केला की, गुन्हा दाखल व्हावा, ही योजना ही आवताडे याचीच असू शकते, कारण अनेक गुंतवणूकदार तक्रार करायला पुढे येत नव्हते.
त्यांना परतावा मिळेल, अशी आश्वासने देऊन वेळ काढली जात होती. मात्र, या सर्व टाळाटाळीनंतर आता अनेकांचे लाखो रुपये अडकले आहेत. पोलीस प्रशासनाने याप्रकरणी कठोर भूमिका घ्यावी आणि गुंतवणूकदारांचे पैसे परत मिळवण्यासाठी तातडीने कारवाई करावी. या मागणीसाठी सोमवार, दि.१४ जुलै रोजी श्रीगोंदा तहसील कार्यालयासमोर आंदोलन व उपोषण करण्यात येणार असून यामध्ये फसवणूक झालेले गुंतवणूकदार मोठ्या संख्येने सहभागी होण्याची शक्यता आहे.