श्रीरामपूर- जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, अशोकनगर येथे एका आगळ्यावेगळ्या उपक्रमात इयत्ता तिसरीच्या विद्यार्थ्यांनी लोकशाहीच्या मूलतत्त्वांचा प्रत्यक्ष अनुभव घेतला. वर्गशिक्षिका स्वाती पटारे – निमसे यांच्या संकल्पनेतून व मुख्याध्यापक पांडुरंग पटारे यांच्या मार्गदर्शनाखाली तिसरीच्या वर्गात ६ मंत्र्यांच्या निवडीसाठी निवडणूक प्रक्रिया राबविण्यात आली.
निवडणुकीसाठी विद्यार्थ्यांना प्रथम संपूर्ण प्रक्रिया समजावून सांगण्यात आली. ‘व्होटिंग अॅप’ चा वापर करून मतदानाची आधुनिक पद्धत शिकवण्यात आली. अर्ज भरण्यापासून ते निकाल जाहीर होईपर्यंत प्रत्येक टप्प्यात विद्यार्थ्यांना सक्रीय सहभाग दिला गेला. उमेदवारीसाठी १८ अर्ज प्राप्त झाले. त्यानंतर घेण्यात आलेल्या परीक्षेत ५०% पेक्षा अधिक गुण मिळवणाऱ्या ९ उमेदवारांची अंतिम निवड करण्यात आली.

८ जुलै रोजी अर्ज भरणे, ९ जुलै अर्ज माघारी, १० जुलै उमेदवारांची परीक्षा, ११ ते १३ जुलै प्रचार, १४ जुलै मतदान व १५ जुलै रोजी निकाल जाहीर करण्यात आला. या संपूर्ण प्रक्रियेत विद्यार्थीच मतदान अधिकारी म्हणून काम करत होते. मतदारांची ओळख पटवणे, सही घेणे, शाई लावणे इ. सर्व प्रक्रिया त्यांनी नेटाने पार पाडल्या.
निकाल जाहीर होताच विजयी उमेदवारांनी गुलाल, फटाक्यांमध्ये जल्लोष साजरा केला. काही उमेदवार थोडक्याच मतांनी पराभूत झाल्यामुळे अश्रू अनावर झाले, हेही दृश्य विद्यार्थ्यांना निवडणुकीच्या वास्तवाचा अनुभव देणारे ठरले. १६ जुलै रोजी मुख्यमंत्र्यांपासून अभ्यास मंत्र्यांपर्यंत पदभार वितरण व शपथविधी पार पडला. विशेष म्हणजे विजयी उमेदवारांनी दुसऱ्याच दिवशी आभार सभेचे आयोजन करून सहविद्यार्थ्यांना चॉकलेटचे वाटपही केले.
पालक वर्गातून या उपक्रमाचे भरभरून कौतुक होत आहे. या यशस्वी आयोजनामध्ये मुख्याध्यापक पांडुरंग पटारे, उपशिक्षक बाळू दळवी, श्री. उंडे, श्री. घोडके, श्री. पटारे, श्री. कुळधरण, श्रीम. परदेशी, श्रीम. देशपांडे, पल्लवी पटारे, श्रीम. कुलकर्णी यांचे मोलाचे योगदान लाभले.