श्रीरामपूर शहरातील आठवडे बाजार पुन्हा जुन्या जागेवरच भरणार, आमदार हेमंत ओगले यांच्या पुढाकारातून प्रश्न लागला मार्गी

Published on -

श्रीरामपूर- गेल्या दोन आठवड्यांपासून श्रीरामपूरचा बाजार दोन ठिकाणी भरल्याने व्यापारी व शेतकऱ्यांमध्ये संभ्रम निर्माण झाला होता. मात्र, आमदार हेमंत ओगले यांनी काल पुढाकार घेत विक्रेते व शेतकऱ्यांचे म्हणणे ऐकून घेतले. मोरगे वस्ती, अक्षय कॉर्नर परिसरात जागेची आखणी करून रस्त्यावर तसेच शाळा व हॉस्पिटलला अडथळा होणार नाही, अशा स्थितीत विक्रेते व शेतकऱ्यांनी आपली दुकाने लावावी, अशा सूचना दिल्या.

मागील पंधरा दिवसांपासून दर शुक्रवारचा आठवडे बाजार शहरात चर्चेचा विषय बनला होता. दि. २५ जुलै रोजी पालिकेचे मुख्याधिकारी मच्छिद्र घोलप यांनी पत्रक काढून मोरगे वस्ती, अक्षय कॉर्नर व संजीवनी हॉस्पिटल परिसरात भरणारा आठवडे बाजार म्हाडा कॉलनीतील मुख्य रस्त्यावर बसविणार असा आदेश दिला होता. जुन्या ठिकाणी कोणी दुकान लावल्यास विक्रेत्यांवर कडक कारवाई करण्याचा इशाराही दिला होता.

त्यानंतर बाजारतळ परिसरात काहींनी, तर म्हाडा कॉलनीतील मुख्य रस्त्यावर काही विक्रेत्यांनी दुकाने थाटली होती. आठवडे बाजार चक्क दोन ठिकाणी भरल्याने विक्रेते, शेतकरी व बाजारकरूंमध्ये संभ्रम निर्माण झाला होता.

मोरगे वस्ती, अक्षय कॉर्नर येथे स्ट्रीट लाईट असल्याने बाजार रात्री ८ वाजेपर्यंत चालतो, तर म्हाडा कॉलनी शहराच्या बाजुला आहे. येथील रस्त्यावर स्ट्रीट लाईटची व्यवस्था नसल्याने व्यापारी व शेतकरी येथे बसण्यास तयार नव्हते. विक्रेते व शेतकऱ्यांनी मुख्याधिकाऱ्यांना ‘आम्हाला येथेच बाजारासाठी बसू द्यावे, अशी विनंती केली होती. परंतु, त्यांच्या आंदोलनाची व विनंतीची मुख्याधिकाऱ्यांनी दखल घेतली नव्हती. पर्यायाने त्यांना म्हाडा कॉलनीतील रस्त्यावर अंधारात आपला माल विकावा लागला होता.

या आठवड्यात काहीतरी मार्ग निघेल, असे विक्रेते व शेतकऱ्यांना वाटले परंतु, कालही पालिका प्रशासनाने मोरगे वस्ती भागात पोलीस बंदोबस्त तैनात करून विक्रेत्यांना बसण्यास मज्जाव केला. त्यामुळे व्यापारी व शेतकऱ्यांनी पालिका प्रशासनाविरुद्ध संताप व्यक्त करून आमदार हेमंत ओगले व पालिकेचे माजी उपनगराध्यक्ष करण ससाणे यांच्याशी संपर्क केला.

आमदार ओगले व ससाणे यांनी तत्काळ भेट देत विक्रेते व शेतकऱ्यांचे म्हणने ऐकून घेत पालिका अधिकाऱ्यांना चांगलेच धारेवर धरले. पालिकेचे अधिकारी म्हणाले, ‘हा आदेश मुख्याधिकाऱ्यांचा आहे. त्यावर आमदार ओगले म्हणाले, ‘गेल्या पंधरा-वीस वर्षांपासून याठिकाणी बाजार बसतो आहे. या बाजारावर अनेक शेतकरी व विक्रेत्यांनी रोजी-रोटी अवलंबून आहे. माझे स्वतःचे घर याच भागात आहे, त्यामुळे आम्हाला काही अडचण नाही.

भविष्यात व्यापारी व शेतकऱ्यांना पालिका प्रशासनाने त्रास दिल्यास माझा व तुमचा संघर्ष पेटेल, असा इशारा दिला. सर्व व्यापारी व शेतकऱ्यांनी रस्त्याला अडथळा निर्माण होणार नाही तसेच शाळा हॉस्पिटलचा परिसर सोडून आपली दुकाने लावण्याचे आदेश त्यांनी दिले.

अक्षय कॉर्नर, मोरगे वस्ती भागात मालाला मागणी होती; परंतु दोन ठिकाणी बाजार भरल्यामुळे विक्रेते व शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले होते. आता आमदार ओगले व ससाणे यांनी यावर मार्ग काढल्याने व्यापारी व शेतकऱ्यांनी त्यांचे आभार मानले.

आ. ओगले यांनी हस्तक्षेप केल्यानंतर आठवडे बाजार पूर्वीच्या ठिकाणी हलविण्यात आला असला तरी भविष्यात आणखी एखाद्या नेत्याचा हस्तक्षेप होण्याची शक्यता नाकारता येत नाही. यात शेतकरी व विक्रेते यांची हेळसांड होत आहे. त्यासाठी स्वतंत्र बाजारतळाची निर्मिती करणे आवश्यक असून, सर्व पुढाऱ्यांनी त्यादृष्टीनेच विचार करावा, अशी बाजारकरूंची मागणी आहे.

म्हाडा कॉलनीत बाजार भरविण्यासाठी नागरिकांपेक्षा विक्रेते व शेतकरी यांनाच उत्साह नव्हता. ज्याठिकाणी २० वर्षापासून बाजार भरत होता त्याठिकाणी सर्व सुविधांसह ग्राहकांची संख्याही मोठी होती. त्या तुलनेत म्हाडातील सुविधा विक्रेत्यांना तोकड्या वाटल्या. शिवाय बाजार एका बाजुला आल्याने ग्राहकांचाही तुटवडा जाणवला. त्यामुळे त्यांनी आपले गाऱ्हाणे आमदारांसमोर मांडले होते. व्यापारी व शेतकरी यांना आ. ओगले व ससाणे यांना धन्यवाद दिले आहेत.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News

Stay updated!