जेऊर – नगर तालुक्यातील जेऊर परिसरात रोडरोमिओंचा वाढता उपद्रव लक्षात घेता गावातील तरुणांनी एकत्र येत टपरींना धडा शिकविण्याचा निर्णय घेतला आहे. विद्यालय तसेच विद्यालय परिसरातील रस्त्यांवर गस्त घालून विद्यार्थिनींच्या रक्षणासाठी तरुण एकवटणार आहेत.
तरुणांच्या भूमिकेमुळे विद्यार्थिनी तसेच पालक वर्गामधून समाधान व्यक्त केले जात आहे. जेऊर परिसरामध्ये गेल्या अनेक दिवसांपासून रोड रोमीओंनी उच्छाद मांडला आहे. गावातील विद्यालय परिसर तसेच विद्यालयात जाणारे जाणारे रस्ते रोडरोमीओंच्या विळख्यात सापडले आहेत. घोळक्याने दारूच्या नशेत तुर्र असणाऱ्या टपोरींची दहशत देखील वाढली आहे.

यापूर्वी शाळेतील शिक्षकांना अरेरावी तसेच रोडरोमीओमध्ये आपापसात हाणामारी असे प्रकार देखील घडलेले आहेत. जेऊर येथे माध्यमिक शिक्षणासाठी ससेवाडी, बहिरवाडी, चापेवाडी, आढाववाडी, वाघवाडी, तोडमलवाडी, धनगरवाडी, इमामपूर तसेच विविध वाड्या वस्त्यांवरील विद्यार्थी विद्यार्थिनी शिक्षणासाठी येत असतात. बहुतांशी विद्यार्थिनी पायी अथवा सायकल वरून विद्यालयात येत असतात.
अशा विद्यार्थिनींचा पाठलाग करणे, टॉन्ट मारणे, छेडछाड करणे, कट मारणे असले प्रकार घडत आहेत. परंतु शिक्षण बंद होईल या भीतीपोटी विद्यार्थिनी झालेला प्रकार पालकांना अथवा शिक्षकांना सांगत नाहीत. याचाच फायदा रोड रोमिओ घेत आहेत. रोड रोमीओच्या वाढत्या उपद्रवामुळे गावातील तरुणांनी एकत्र येत त्यांना चांगलाच धडा शिकविणार असल्याची भूमिका घेतली आहे. काही ग्रामपंचायत सदस्यांनीही याबाबत पुढाकार घेतला असून गावात लवकरच बैठक आयोजित करण्यात येणार आहे.
आमच्या बहिणींची तसेच मुलींच्या रक्षणासाठी आम्ही समर्थ असल्याचा इशारा तरुणांनी दिला आहे. रोड रोमीओना धडा शिकवण्यासाठी महाविद्यालय परिसर व विद्यार्थिनींच्या रस्त्यांवर गस्त घालून रोड रोमीओना पकडून पोलिसांच्या ताब्यात देण्याचा निर्धार तरुणांनी केला आहे. तरुणांच्या आक्रमक भूमिकेमुळे विद्यार्थिनी तसेच पालक वर्गामधुन समाधान व्यक्त केले जात आहे.
विद्यार्थिनींनी समोर यावे
विद्यार्थिनींनी न घाबरता टपोरी मुलांकडून पाठलाग, छेडछाड होत असल्यास त्याची कल्पना पालक अथवा शिक्षकांना द्यावी. त्रास देणाऱ्या रोड रोमीओंच्या दहशतीला न जुमानता विद्यार्थिनी व पालकांनी समोर यावे. आम्ही त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणार असल्याची भूमिका तरुण वर्गाने घेतली आहे.